Husband Teaching Driving Accident: डोंगररस्त्यावर ड्रायव्हिंग शिकवताना एका क्षणी घडलेली थरारक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सुरुवातीला सर्व काही सुरळीत दिसत असताना अचानक चालक महिलेचे कार व्हीलवरील नियंत्रण सुटते आणि त्यानंतर काही क्षणांतच ती कार आतील दोन व्यक्तींसह खोल दरीत कोसळते. हा संपूर्ण प्रकार जवळच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे.

व्हायरल होत असलेल्या या दृश्यात एक महिला कार चालवण्याचा सराव करताना दिसते. तिच्या शेजारी नव्हे, तर कारच्या बाहेर उभा राहून एक पुरुष तिला मार्गदर्शन करत असल्याचे दिसते. सुरुवातीला कार हळूहळू पुढे सरकत असते; मात्र काही क्षणांतच परिस्थिती बदलते. कारचा वेग अनियंत्रित होतो, त्या चालक महिलेची स्टेअरिंगवरील पकड सैल होते आणि वाहन रस्त्याच्या कडेला झुकू लागते. पुढच्या क्षणाला कार थेट रस्त्याबाहेर घसरत खोल दरीत कोसळते. हा संपूर्ण प्रसंग इतक्या झपाट्याने घडतो की, पाहणाऱ्यांनाही धक्का बसतो.

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाल्याचे दिसते. काही स्थानिक नागरिक तत्काळ घटनास्थळी धाव घेतात. विशेष बाब म्हणजे व्हिडीओमध्ये काही भटकी कुत्रीही आधीच दरीकडे धावताना दिसतात, जणू काही त्यांनाही काहीतरी अनर्थ घडल्याची जाणीव झाली असावी. त्यानंतर आसपासचे लोक मदतीसाठी पुढे सरसावतात. जखमी महिलेला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. अनेकांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी, “अशा धोकादायक डोंगररस्त्यावर ड्रायव्हिंग शिकवणे ही मोठी बेपर्वाई आहे“, असे म्हटले आहे. “अशा ठिकाणी वाहन चालवण्याचा सराव करणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देणे,” अशी प्रतिक्रिया एका वापरकर्त्याने दिली आहे. तर काहींनी या घटनेकडे संशयाने पाहिले आहे. “ही केवळ चूक होती की यामागे काही वेगळे कारण आहे,” असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. काहींनी तर अधिक गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या अपघातात नेमके किती नुकसान झाले, जखमी महिलेची प्रकृती कशी आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा थरारक क्षण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, डोंगराळ भागात वाहन चालवताना अधिक दक्षता बाळगण्याची गरज अधोरेखित करत आहे.

येथे पाहा व्हिडीओ

हा धक्कादायक प्रकार हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे घडल्याची माहिती समोर आली आहे. डोंगररस्त्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या पर्यटनस्थळी घडलेली ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.