टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मराठी आलं पाहिजे हा मुद्दा सध्या मुंबईत चर्चेत आला आहे. दरम्यान मुंबईतला नाही पण हैदराबाद या ठिकाणी असलेला एक टॅक्सीवाला त्याच्या टॅक्सीतल्या नियमावलीमुळे चर्चेत आला आहे. या नियमावलीवरुन लोक उलटसुलट चर्चा करत आहेत, सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. या टॅक्सीचालकाने एक नियमावली लावली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आपण जाणून घेऊ हे प्रकरण नेमकं काय आहे?

टॅक्सी चालकाने एक नियमावली पोस्ट केली आहे

Aman नावाच्या युजरने टॅक्सी चालकाच्या टॅक्सीतली नियमावली पोस्ट केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या टॅक्सी चालकाने ड्रायव्हर सीटच्या मागे ही नियमावली पोस्ट केली आहे. तसंच ग्राहकांनी त्यांचा अॅटीट्युड घरी ठेवून टॅक्सीत बसावं ही तुमच्या मालकीची टॅक्सी नाही, टॅक्सी चालकाची टॅक्सी आहे असंही लिहिलं आहे.

टॅक्सी चालकाने लावलेली नियमावली नेमकी काय आहे?

तुम्ही टॅक्सीचे मालक नाहीत, ग्राहक आहात हे विसरु नका

जो माणूस टॅक्सी चालवतो आहे, तो टॅक्सीचा मालक आहे हे विसरु नये

तुम्ही टॅक्सी चालकाशी आदराने बोला

दरवाजा लावताना काळजी घ्या, हळू दरवाजा लावा.

तुमचा अभिमान, गर्व हे सगळं तुमच्या खिशात ठेवा, तो आम्हाला दाखवण्याची गरज नाही कारण तुम्ही आम्हाला जास्तीचे पैसे देत नाही.

आम्हाला भय्या असं म्हणून पुकारु नका, त्याची गरज नाही.

महत्त्वाची सूचना : जरा जोरात गाडी चालवा हे आम्हाला सांगू नका, त्यापेक्षा तुम्ही वेळेवर या.

आणखी एक महत्त्वाची सूचना

टॅक्सीत रोमान्स करु नका, ही टॅक्सी आहे.

तुमची खासगी जागा किंवा ओयोची रुम नाही

एकमेकांमध्ये अंतर ठेवून बसा, शांत बसा

आदर दिलातर तर आदर मिळेल हे विसरु नका

धन्यवाद

टॅक्सीत बसून चाळे करु नका वगैरेही सूचना दिल्या आहेत, सोशल मीडियावर पोस्टची चर्चा

तुम्ही आम्हाला जास्तीचे पैसे देत नाहीत हे लक्षात ठेवा, टॅक्सीत बसून चाळे करु नका असंही त्याने सुनावलं आहे. तसंच आम्हाला भय्या हाक मारु नका अशा सगळ्या सूचना या माणसाने दिल्या आहेत. सोशल मीडियावर या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसंच सोशल मीडियावर पोस्टची चर्चा रंगली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत?

सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. एका युजरने म्हटलं आहे बुकिंग केलं हेच लोक फोन करतात आणि भाडे जास्त द्या कमी करा, तेवढ्याच पैशात सोडतो वगैरे गयावया करतात. दुसरा युजर म्हणतो तो टॅक्सीचा मालक असेल पण आम्ही टॅक्सीचे ग्राहक आहोत हे त्यानेही विसरु नये. काही लोकांनी या टॅक्सी चालकाला पाठिंबाही दिला आहे. तर काही लोक म्हणत आहेत की अशा प्रकारची नियमावली लावली तर त्याच्या निश्चितपणे या टॅक्सी चालक-मालक माणसाच्या ग्राहकांवर परिणाण होईल. तसंच ग्राहकांचा आणि टॅक्सी चालकांचा यामुळे वादही होऊ शकतो. कामाव आलेला वैताग ग्राहक या सूचना वाचून त्या टॅक्सी चालकावर काढू शकतात असंही काहींचं म्हणणं आहे.

टॅक्सी चालकाचा भय्या शब्दाला विरोध का? नेटकऱ्यांचा सवाल

कॅब चालक थोडक्यात तुम्हाला सांगतोय इथे टॅक्सीत बसलात तर मी बॉस आहे तुम्ही नाही असं एका युजरने म्हटलंय. शिवाय आणखी एक युजर म्हणतो टॅक्सी चालकाला भय्या का नाही म्हणायचं? भय्या म्हणणं म्हणजे आदर देणंच आहे. बाकीची नियमावली मान्य पण हा कसला डोंबलाचा नियम आहे? दुसरा युजर म्हणतो भय्या नाही म्हणायचं मग काय ए ड्रायव्हर चल असं म्हणू का? की सर वगैरे म्हणायचं? भय्या शब्दावर या माणसाचा आक्षेप का? अशीही कमेंट एका युजरने केली आहे. काहींचं तर असंही म्हणणं आहे की १०० टक्के ही पोस्ट खोटी आहे. हैदराबादचा टॅक्सी चालक असं लिहिणारच नाही. आणखी एक युजर म्हणतो मला या माणसाचे सगळे नियम मान्य आहेत, पण भय्या का नाही म्हणायचं हे जरा मला हा सांगेल का? आणखी एका युजरने लिहिलंय की समजा एक माणूस चिडचिड करत याच्या टॅक्सीत बसला, त्या टॅक्सीचालकावर खेकसला की गाडी जोरात चालव आणि त्याने बसताना दरवाजा आपटून बंद केला मग ही नियमावली वाचली तर काय होईल? अशा पोस्ट नेटकरी करत आहेत.