Hyundai New Affordable EV Launching Soon: इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय वाहन बाजारात स्वस्त आणि छोट्या आकाराच्या इलेक्ट्रिक कारची मागणी हळूहळू वाढत आहे, त्यामुळे आता या विभागात आणखी एका मोठ्या कंपनीची एंट्री होणार आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लवकरच आपली नवी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे या कारच्या लाँचिंगबाबत यापूर्वी सांगितलेल्या वेळापत्रकापेक्षा आता वेगळी माहिती समोर आली आहे.
सध्या स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या बाजारात टाटा टियागो ईव्ही आणि एमजी कॉमेट ईव्हीसारख्या गाड्यांकडे ग्राहकांचे लक्ष असते. अशा परिस्थितीत ह्युंदाईची नवी इलेक्ट्रिक कार दाखल झाल्यास या विभागातील स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
लाँचिंगबाबत मोठी अपडेट
ह्युंदाई मोटर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक तरुण गर्ग यांनी कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक कारबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. यापूर्वी ही कार मार्च २०२७ पर्यंत भारतीय बाजारात दाखल होईल, अशी माहिती समोर आली होती. मात्र, आता कंपनी ही कार त्याआधीच बाजारात आणण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही नवी इलेक्ट्रिक कार २०२६ च्या अखेरीस भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या ग्राहकांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही.
सुरुवातीला कोणत्या बॅटरीचा वापर?
या आगामी इलेक्ट्रिक कारमध्ये सुरुवातीला स्वोल्ट कंपनीच्या बॅटरी सेलचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर कंपनी एक्साइडच्या बॅटरी सेलचा वापर करण्याची शक्यता आहे. ह्युंदाईची मूळ योजना एक्साइडच्या बॅटरी सेलचा वापर करण्याचीच होती, मात्र त्यासाठी अधिक वेळ लागला असता, त्यामुळे कारचे लाँचिंग आणखी लांबणीवर जाऊ नये म्हणून सुरुवातीला स्वोल्ट सेलसह कार बाजारात आणण्याची तयारी करण्यात आली आहे.
ह्युंदाईला आपल्या देशांतर्गत विक्रीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा वाढवण्याची अपेक्षा आहे. कंपनीला पुढील वर्षापर्यंत देशातील एकूण विक्रीमध्ये इलेक्ट्रिक कारचा वाटा सुमारे ७ टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याची आशा आहे.
सध्या ह्युंदाईच्या ईव्हीची विक्री किती?
आर्थिक वर्ष २०२६ म्हणजे एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीचा विचार केला, तर भारतातील ह्युंदाईच्या एकूण विक्रीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा केवळ १ टक्का होता. आर्थिक वर्ष २०२५ मध्येही परिस्थिती जवळपास अशीच होती, त्यामुळे आगामी कॉम्पॅक्ट ईव्ही कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
कारमध्ये काय खास असेल?
या नव्या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कारला सध्या एचई१आय असे कोडनेम देण्यात आले आहे. ही कार हुंदाईच्या ई-जीएमपी (के) प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. विशेष म्हणजे याच प्लॅटफॉर्मचा वापर आंतरराष्ट्रीय बाजारातील इन्स्टर ईव्हीमध्येही केला जातो.
ही कार दोन प्रकारांमध्ये येण्याची शक्यता आहे. ग्राहकांना स्टँडर्ड रेंज आणि लाँग रेंज असे पर्याय मिळू शकतात, त्यामुळे आपल्या दैनंदिन वापरानुसार ग्राहकांना योग्य पर्याय निवडता येण्याची शक्यता आहे.
एका चार्जमध्ये किती अंतर धावणार?
सध्या या कारची बॅटरी क्षमता आणि अधिकृत रेंज कंपनीने जाहीर केलेली नाही. मात्र उपलब्ध माहितीनुसार, ही कार एका चार्जमध्ये सुमारे ३५५ किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हा आकडा अधिकृत नसून केवळ अंदाज आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
फक्त रेंजच नाही तर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही ही कार आधुनिक असण्याची शक्यता आहे. कंपनीने आगामी कॉम्पॅक्ट ईव्हीमध्ये नेक्स्ट जनरेशन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्याचे निश्चित केले आहे, त्यामुळे कारमध्ये प्लेओस कनेक्ट इन्फोटेनमेंट सिस्टम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मग ही स्वस्त ह्युंदाई ईव्ही नेमकी कोणती?
आता या कारचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच वाढली असेल; तर ह्युंदाईची ही आगामी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार एचई१आय या कोडनेमने विकसित केली जात आहे. तिचे अधिकृत नाव कंपनीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
मात्र, ही कार २०२६ च्या अखेरीस भारतात लाँच होण्याची शक्यता आहे, त्यामुळे टियागो ईव्ही आणि कॉमेटसारख्या छोट्या इलेक्ट्रिक कारना आगामी काळात ह्युंदाईच्या या नव्या गाडीमुळे कडवी स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे. कारची अधिकृत किंमत, बॅटरी क्षमता आणि अंतिम रेंजची माहिती कंपनीकडून लाँचिंगच्या जवळ जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
