हिमालय आपल्या भव्य आणि नितांतसुंदर सौंदर्यासाठी ओळखला जातो. कधी शांत अशा निसर्गाचा वेगळाच अनुभव तो देतो. प्रत्येक ऋतूत हिमालयाचं रूप बदलतं. हिवाळ्यात तर इथली थंडी अंगात भिनते. बर्फानं झाकलेली शिखरं, धुक्यात लपलेल्या दऱ्या आणि दूरवर पसरलेली पांढरी चादर पाहिली की, माणूस क्षणभर वेगळ्याच दुनियेत हरवतो.
पण हे सौंदर्य जितकं मनमोहक आहे, तितकीच निसर्गाचं बदलणारं भीतीदायक रूपही त्यात दडलेलं आहे. अलीकडे हिमाचल प्रदेशात हवामान अचानक बदलल्यामुळे हिमालय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर दिसणारी दृश्यं पाहून काही लोक थक्कही झाले आहेत; तर काहींना निसर्गाच्या या वेगळ्या रूपाची भीतीही वाटू लागली आहे.
हिमाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील आठवडाभरापासून सातत्याने जोरदार बर्फवृष्टी होत आहे. या सततच्या बर्फवृष्टीमुळे संपूर्ण हिमालय परिसर अक्षरशः पांढऱ्या चादरीत गुंडाळल्यासारखा भासत आहे. तापमानात मोठी घसरण झाल्यानं थंडीही खूप वाढली आहे. याचदरम्यान चंबा जिल्ह्यातील पांगी व्हॅलीमधून एक धक्कादायक दृश्य समोर आले. या व्हायरल व्हिडीओमध्ये डोंगरांच्या मधोमध एक प्रवाह वाहताना दिसतो; पण हा प्रवाह पाण्याचा नसून बर्फाचा आहे. वितळलेल्या बर्फाचे मोठमोठे तुकडे पाण्यासारखे वाहत जात असल्याचे दृश्य या व्हिडीओमध्ये दिसते.
अंदाजानुसार, हा प्रवाह चंद्रभागा नदीचा (वरची चिनाब) एखादा भाग किंवा तिची सहायक धारा असू शकतो, जी जवळपास ८५ किलोमीटर अंतर पार करते. अलीकडील प्रचंड बर्फवृष्टीमुळे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात बर्फ साचून, तो प्रवाही स्वरूपात हालचाल करीत असल्याने ‘नदीच्या प्रवाहाऐवजी बर्फाचे वाहत जाणारे तुकडे’ असे एक वेगळेच दृश्य निर्माण झाला आहे. हा व्हिडीओ ट्विटर @nikhilsaini या युजरने शेअर केला असून, ‘हिमालयात भरपूर बर्फवृष्टी झाली आहे’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी या दृश्याला ‘निसर्गाचा चमत्कार’ म्हणत कौतुक केले; तर काहींनी धोक्याची चिन्हे आणि हवामान बदलाबद्दल चिंता व्यक्त केली. हिमालयीन भागात सक्रिय झालेल्या नव्या पश्चिमी जागांमुळे हिमाचल प्रदेशातील हवामान पूर्णपणे बदलले आहे.
बहुतांश भागांत पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. हवामान विज्ञान केंद्र, शिमला यांनी चंबा, कुल्लू, लाहौल व स्पीती जिल्ह्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ऊना, बिलासपूर, हमीरपूर, कांगडा, सोलन, सिरमौर व मंडी जिल्ह्यांत गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या साऱ्या घडामोडींमुळे हिमालयात पुन्हा एकदा सौंदर्य आणि भय अशा दोन्ही भावना एकाच वेळी अनुभवायला मिळत आहेत.
