आयआयएम अमृतसरच्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विद्यार्थी मेसच्या टेबलावर डोके ठेवून झोपलेले दिसत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने बसलेले विद्यार्थी पाहून ते जणू काय वर्गात असल्याचे दिसते. मात्र, हे विद्यार्थी मेसमध्ये झोपून आंदोलन करत आहेत. अमृतसरमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचा व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन करत या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्यांकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अमृतसरच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं आहे. हे विद्यार्थी राहत ज्या वसतिगृहामध्ये राहत आहेत. त्या खोल्यांमध्ये एअर कंडिशनर (एसी) नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हामुळे त्रास होत असल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे वसतिगृहामध्ये एअर कंडिशनर (एसी) बसवण्यात यावेत, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. हे विद्यार्थी कडक उन्हामुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं आंदोलन करत व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा : इतर राष्ट्रप्रमुख फोटोसाठी उभे असताना जो बायडेन मात्र भलतीकडेच निघाले; जॉर्जिया मेलोनींनी लक्षात आणून दिल्यावर ऐटीत काढला फोटो!

विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी केलेल्या या आंदोलनावर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच वास्तविक या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं, तेथे एसी बसवलेले असून ती त्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची मेस आहे. त्यामुळे उन्हापासून स्वत:चा बचाव करत आंदोलन करत आपल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाकडे केली आहे.

दरम्यान, सध्या अमृतसरचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास झाला सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी मेसमध्ये झोपत व्यवस्थापनाकडे एसी बसवण्याची मागणी केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या अमृतसरच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर वृत्तानुसार, आयआयएम अमृतसरच्या संचालकांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काही दिवसांत एअर कुलरची व्यवस्था करण्यात येईल”, असं स्पष्टीकरण यानंतर व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे.