बेलिश ग्रुपच्या (Bellish Group) संस्थापक आणि सीईओ प्रांशी चतुर्वेदी यांनी एका आयआयटी कानपूर येथील पदवीधर असलेल्या व्यक्तीबरोबर त्यांना आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्यक्तीने एक यशस्वी कंपनी उभारली होती, मात्र उत्पादकांबरोबर काम करताना येणाऱ्या आव्हानांना कंटाळून त्याने ती कंपनी सोडून देऊन पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला. प्रांशी चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स केलेल्या एका पोस्टद्वारे या आयआयटी पदवीधर असलेल्या व्यक्तीचा अनुभव शेअर केला आहे.
चतुर्वेदी यांनी सांगितले की, त्या आयआयटी कानपूर येथून पदवी घेतलेल्या एका व्यक्तीला गोव्याच्या ट्रीपदरम्यान भेटल्या. या भेटीत त्यांना कळाले की त्याने स्वतःचा एक बुटाचा ब्रँड उभा केला होता, ज्याची महिन्याला २ कोटी रूपयांची विक्री देखील होत होती. असे असून देखील हा उद्योजक दु:खी होता आणि अखेर त्याने कंपनी सोडून दिली आणि एका गुडगाव येथील स्टार्टअपमध्ये काम करू लागला.
स्वतःची कंपनी सोडून दिली
चतुर्वेदी यांनी सांगितल्यानुसार, आयआयटीएन फाउंडरने उद्योगजकता (entrepreneurship) सोडून दिली कारण त्याला त्याचे सुरतमधील उत्पादक ज्या पद्धतीने काम करत होते ते आवडले नाही “माझ्या अलीकडच्या एका ट्रिपदरम्यान, मी आयआयटी कानपूरच्या एका माजी विद्यार्थ्याला भेटले, ज्याने आपल्या डी२सी शूज ब्रँडची महिन्याची विक्री २ कोटी रुपयांपर्यंत नेली होती. परंतु, सुरतमधील उत्पादकांची काम करण्याची पद्धत त्याला आवडली नाही, म्हणून त्याने अखेर हा व्यवसाय सोडून दिला,” असे त्यांनी आपल्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महिन्याला दोन कोटी मिळणारी स्वतःची कंपनी सोडून दिल्यानंतर हा आयआयटीमध्ये शिकलेला व्यक्ती आता गुडगाव येथील एका स्टार्टअपमध्ये इंजिनिअर म्हणून काम करतो.
“आता तो गुडगावमधील एका स्टार्टअपमध्ये लीड इंजिनीअर म्हणून काम करत आहे, ज्या स्टार्टअपला सीरीज ए फंडिंग मिळाले आहे,” असे चतुर्वेदी यांनी त्या व्यक्तीचे नाव उघड न करता सांगितले.
स्वतःचा उद्योग सोडून नोकरी करण्याच्या निर्णयाबद्दल अधिक स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, “त्याने हे सोडण्याचे जे कारण सांगितले ते म्हणजे पुरवठ्यातील समस्या. या गोष्टीला तो पूर्णपणे वैतागून गेला होता आणि त्याने आपले इंजिनीअरिंग माइंड दुसरीकडे कुठेतरी वापरण्याचा निर्णय घेतला.”
“सुरतच्या उत्पादकांसोबत काम करण्यास नकार देण्यामागे जातीचा काही विषय होता का, या सर्व चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. “यामध्ये कोणताही जातीचा किंवा समुदायाचा अँगल नव्हता. हा जोखीम घेण्याच्या क्षमतेचा मुद्दा होता,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हा अनुभव वाचून अनेक इंटरनेट वापरकर्त्यांना एखादी व्यक्ती इतकी यशस्वी कंपनी सोडून पुन्हा नोकरीकडे कसा जाऊ शकतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. अनेकांनी उत्पादकांची कोणती अशी गोष्ट होती ज्यामुळे या व्यक्तीने उद्योग सोडून देण्याचा निर्णय घेतला याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.
