बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी चिनच्या ‘किंगडाओ’ खाद्य कंपनी आणि ‘Baobeihuijia.com’ ने नवी शक्कल लढवली आहे. या बेपत्ता मुलांचे फोटो आणि त्यांची माहिती त्यांनी पाण्याच्या बाटल्यांवर छापायला सुरूवात केली आहे. या नव्या युक्तीचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक होत आहे. ‘बेबी कम होम’ अशी ओळ लिहून त्यांनी आतापर्यंत बेपत्ता झालेल्या अनेक मुलांचे फोटो या बाटल्यांवर छापले आहे. या दोघांनी मिळून ५ लाखांहून अधिक बाटल्यांवर हे फोटो छापले आहेत. हरवलेल्या मुलांच्या पालकांची परवानगी घेऊनच ही छायाचित्रे आणि आवश्यक माहिती छापण्यात आली आहे.

मानवी तस्करी आणि किडनी रॅकेटसाठी या मुलांचे मोठ्या प्रमाणात अपहरण केले जाते. या मुलांचा शोध घेण्यास अपयश आले की त्यांना मृत घोषीत केले जाते. याच बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी कंपनीने ही मोहिम सुरू केली आहे. चीनच्या एका वेबसाईच्या माहितीनुसार दरवर्षी चिनमधून २ लाखांहून अधिक मुलांचे अपहरण केले जाते. हा आकाडा सर्वाधिक आहे. या बाटल्यांचे रेल्वे स्टेशन, विमानतळ, मॉल आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी वितरण करण्यात आले आहे. अशाप्रकारे या मुलांकडे अधिक लोकांचे लक्ष जाईल असे कंपनी आणि पालकांचे म्हणणे आहे. Baobeihuijia.com या वेबसाईटवर बेपत्ता झालेल्या मुलांसंबधित सगळी माहिती उपलब्ध आहे. या माहितीच्या आधारावर या मुलांना शोध घेतला जातो, त्यामुळे या सुत्य उपक्रमाचे सगळ्यांनी कौतुक केले असून या शोधात त्यांना यश मिळावे अशी प्रार्थना सगळ्यांनी केली आहे. चिनच्या सीसीटीव्ही चॅनेलच्या माहितीनुसार १९७९ मध्ये एका पित्याने आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी अशीच पद्धत वापरली होती. या पित्याने हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी दूधांच्या पिशव्यांवर आपल्या मुलाचे फोटो छापले होते.