जगभरातला करोनाचा वाढता प्रसार हे चिंतेचं कारण ठरलं आहे. त्यामुळे सर्वच देशांनी लसीकरणाच्या उपायावर भर देण्याचं ठरवलं आहे. इटलीने सार्वजनिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये तसंच खेळांमध्ये लस घेतलेल्या नागरिकांना सामील होण्यास बंद घातली आहे. त्यानंतर आता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका माणसाने लसीकरण टाळण्यासाठी बनावट हात बसवून घेत त्या हातावर लस घेण्याचा प्रयत्न केला.

ही व्यक्ती लसीकरणाविरोधी चळवळीमध्ये कार्यरत होती. लस घेतल्याशिवाय प्रमाणपत्र मिळत नव्हतं. म्हणून लस घेणं टाळण्यासाठी त्याने सिलिकॉनचा बनावट हात बसवून घेतला. त्याला वाटलं हा हात आपल्या खऱ्या हाताला लपवू शकेल. मात्र त्याचं हे नाटक आरोग्य कर्मचाऱ्यांनी ओळखलं आणि त्याच्याविरोधात पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार केली.

लस देणारी नर्स फिलीपा बुआ हिला काहीतरी गोंधळ असल्याचं जाणवलं. म्हणून तिने त्या व्यक्तीच्या शर्टच्या बाह्या वर केल्या. तेव्हा तिला जाणवलं की हाताची त्वचा रबरासारखी आणि थंडगार आहे. तसंच या व्यक्तीच्या हाताच्या शिराही दिसत नव्हत्या. तिला वाटलं की ही व्यक्ती दिव्यांग आहे. पण त्यानंतर सगळा प्रकार तिच्या लक्षात आला.

अशा प्रकारे बनाव करणारी ही व्यक्ती एक डेन्टिस्ट असल्याचं इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात नमूद केलं आहे. त्याने लस घेण्याचं नाकारल्यामुळे त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं.