New Baggage Rule for Jewellery in India: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सोने आणि चांदीच्या एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्येदेखील (ईटीएफ) २ फेब्रुवारी रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली. बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मंगळवारी देशभरात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर १,४९,४२० रूपये आहे, तर २२ कॅरेटचा दर १,३६,९६८ रूपये आहे. तसंच १ किलो चांदीचा दर २,५४,०२० रूपये आहे, तर १० ग्रॅम चांदीचा दर २,५४० रूपये आहे.

यालाच अनुसरून परदेशातून दागिने घरी आणू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी सरकारने सामानाचे नियम सोपे केले आहेत. केंद्र सरकारने सामान नियम, २०२६ (Baggage Rules, 2026) अधिसूचित केले आहेत. नवीन कस्टम्स बॅगेज नियमांमुळे दागिन्यांवरील शुल्क मर्यादा काढून टाकण्यात आली आहे, तर जास्तीत जास्त प्रमाण जैसे थे ठेवण्यात आले आहे.

फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीने परिधान केलेली सोने, चांदी, प्लॅटिनम किंवा यासारख्या इतर मौल्यवान धातूंपासून बनवलेली आभूषणे मग ती अंगावर असो वा नसो, अलंकाराची वस्तू म्हणून त्यांची गणना केली जाते.

भारतात दागिन्यांसाठी नवीन सामान नियम

सरकारने कालबाह्य शुल्क मर्यादा काढून केवळ वजनाच्या आधारावर दागिन्यांसाठी विशेष शुल्क सुरू केले आहेत, ज्या अंतर्गत एक वर्षापेक्षा जास्त काळ परदेशात राहिल्यानंतर परतणारे भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाचे पर्यटक, केवळ वजनाच्या आधारावर शुल्कमुक्त दागिने खरेदी करू शकतात.

महिला प्रवासी ४० ग्रॅम पर्यंतचे दागिने आणू शकतात, तर महिला प्रवाशांव्यतिरिक्त इतर प्रवासी २० ग्रॅम पर्यंतचे दागिने आणू शकतात. हे आधीच्या मर्यादेप्रमाणेच आहे. १५ वर्षांखालील मुले देखील कोणतेही सीमाशुल्क न भरता ४० ग्रॅम मर्यादेचे सोन्याचे दागिने आणू शकतात.

याचाच अर्थ पूर्वीच्या १ लाख रुपयांच्या मर्यादेवरून, आता महिला आजच्या सोन्याच्या दराप्रमाणे ६ लाख रुपयांपर्यंतचे सोने आणू शकतात.

दागिन्यांसाठी जुना सामानाचा नियम

यापूर्वी भारतीय पासपोर्ट धारकांना २० ग्रॅम पर्यंत सोने (जास्तीत जास्त मूल्य ५०,००० रुपयांपर्यंत) शुल्कमुक्त आणण्याची परवानगी होती. तसंच महिला आणि मुले ४० ग्रॅम पर्यंत सोने (जास्तीत जास्त मूल्य १,००,००० रुपयांपर्यंत) शुल्कमुक्त आणू शकत होते.

नवीन बदल काय आहे?

महिलांसाठी ४० ग्रॅम आणि इतरांसाठी २० ग्रॅम कमाल मर्यादा तशीच राहिली असली तरी, शुल्क मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.

आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी जवळपास १,५०,००० रुपये आहे. मात्र पूर्वीच्या नियमांनुसार, पुरुषांसाठी जास्तीत जास्त ५०,००० रुपये शुल्कमुक्त दागिने आणण्यासाठी परवानगी होती. याचा अर्थ असा की तुम्ही सध्याच्या किमतीत परदेशातून सुमारे ३ ग्रॅम सोने भारतात आणू शकता.

पण आता शुल्क मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. एक वर्षापेक्षा जास्त काळ परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या रहिवासी किंवा पर्यटकाला भारतात परतल्यानंतर, आता महिला प्रवाशाने आणलेल्या ४० ग्रॅम वजनाच्या दागिन्यांना किंवा इतर प्रवाशाने आणलेल्या २० ग्रॅम वजनाच्या दागिन्यांना शुल्कमुक्त मंजुरी दिली जाईल.

सध्याच्या किमतीनुसार, बॅगेज नियम, २०२६अंतर्गत कोणीही ६ लाख रुपयांचे सोने भारतात आणू शकते असे वृत्त फायनान्शियल एक्सप्रेसने दिले आहे.

गुगल ट्रेंड्सवर सोन्या-चांदीच्या दराबाबत विविध चर्चा

सोने किंवा चांदी जास्त प्रमाणात आणता येते, मात्र त्यावर आयात शुल्क भरावे लागते. भारतात सोने आणताना आयात शुल्क ६ टक्के आहे, तर उपकर आणि जीएसटी जोडल्यानंतर एकूण सीमा शुल्क सुमारे ९% आहे. किंमत आणि शुद्धतेसह खरेदी बिल सादर करावे लागते.

केंद्र सरकारकडून बॅगेज नियम, २०२६ अधिसूचित केले असून एक मास्टर सर्क्युलर देखील जारी करण्यात आले आहे.