“देशाला स्वातंत्र्य ९९ वर्षांसाठी भाडेतत्वावर मिळालंय”, भाजपा प्रवक्त्याचा अजब दावा; पाहा व्हिडीओ

त्यावेळी निवडणुका नसल्याने नेहरु आणि गांधीजींनी ब्रिटीश क्राऊनची शपथ घेतली होती, असं वक्तव्यही तिने केलं आहे.

Ruchi Pathak
भाजपा युवा मोर्चाची प्रवक्ता रुची पाठक (छायाचित्र सौजन्य – ट्विटर)

देशाला स्वातंत्र्य ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर मिळालं आहे, असा दावा करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिला असेलच. या व्हिडीओमुळे या तरुणीची चांगलीच टर उडवली जात आहे. नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचं सत्र सुरू केलं आहे. ही तरुणी कोणी सामान्य तरुणी नसून भाजपा युवा मोर्चाची प्रवक्ता आहे. त्यामुळे तिने केलेलं हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे. काय आहे नक्की हे प्रकरण?

लल्लनटॉप या माध्यमाच्या वतीने एक चर्चासत्र भरवण्यात आलं होतं. या सत्रात भाजपा युवा मोर्चाची प्रवक्ता रुची पाठक सहभागी झाली होती. काँग्रेसबद्दल बोलत असताना तिने हे विधान केलं असून काँग्रेसला पूर्ण स्वातंत्र्यही मिळवता आलं नाही. ९९ वर्षांसाठी हे स्वातंत्र्य त्यांनी घेतलेलं आहे, असं विधान रुचीने केलं आहे.

ती म्हणते, “भारत संपूर्णपणे स्वतंत्र झालेला नाही. हे स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वार मिळालेलं आहे. ब्रिटीश क्राऊनने भारताला ९९ वर्षांच्या भाडेकराराने स्वातंत्र्य दिलं आहे आणि यालाही काँग्रेसच जबाबदार आहे. तुम्ही इतिहासाची पानं चाळून पाहा. जेव्हा स्वातंत्र्य आंदोलन चालू होतं आणि पंडित नेहरु व महात्मा गांधी नेतृत्व करत होते, त्यावेळी ब्रिटीशांना आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं. त्यावेळी निवडणुका नसल्याने नेहरु आणि गांधीजींनी ब्रिटीश क्राऊनची शपथ घेतली होती. त्यामुळे आज मिळालेलं स्वातंत्र्य हे ९९ वर्षांच्या भाडेकरारावर मिळालेलं आहे. मी याचे पुरावेही तुम्हाला देऊ शकते”.

तिच्या या दाव्याविषयी कार्यक्रमाच्या निवेदकानेही तिला विचारलं की, जर ही एवढी मोठी गोष्ट आहे तर भाजपाचे नेते, इतर कोणत्याही पक्षाचे नेते, भारत सरकार, ब्रिटीश सरकार कोणीही याबद्दल कसलाच उल्लेख कसा केलेला आढळत नाही? त्यावर आपण या गोष्टींचे पुरावे सादर करु शकतो, असंच तिचं म्हणणं होतं.

तिचं हे विधान आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून अनेक मीम्सचा विषयही ठरत आहे. अनेकांनी तिला व्हॉटसप विद्यापीठाची विद्यार्थिनीही म्हटलं आहे. तर अनेकांनी यावरुन पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे. “म्हणूनच मोदीजी देशातलं सगळं काही विकत आहेत, जेणेकरुन २०४६ नंतर देश पुन्हा ब्रिटीशांच्या ताब्यात जाऊ नये”, असं काही जणांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India got freedom for 99 years lease says bjp speaker vsk

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या