India Iran Diplomacy success as Robert Kiyosaki praises S Jaishankar’s strategic move in Strait of Hormuz : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सध्या सुरू असून याचा परिणाम जगभरात पाहायला मिळत आहे. या संघर्षादरम्यान इराणने जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली आहे. असे असूनही भारताने सध्या जगातील सर्वात अस्थिर सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कोणत्याही लष्करी हस्तक्षेपाशिवाय किंवा संघर्षाशिवाय आपली कच्च्या तेलाची जहाजे सुरक्षितपणे नेण्यात यश मिळवले आहे.
या सर्व परिस्थितीवर ‘रिच डॅड पुअर डॅड’ पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका , युरोप आणि इस्रायलचे जहाजांना रोखले जात असताना किंवा त्यांच्यावर हल्ले केले जात असताना, भारताने सुरक्षितपणे आपले टँकर घेऊन जाण्यात यशस्वी झाल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. भारत सरकारने एकही गोळी न झाडता, २४ तास नियंत्रण कक्ष चालवून आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या फक्त तीन फोन कॉल्सवर सुरक्षित मार्ग मिळवून आपल्या जहाजांचे आणि ऊर्जा पुरवठ्याचे कसे संरक्षण कसे याबद्दल त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे.
भारतीय कप्तान असलेले ‘शेनलाँग’ (Shenlong) हे लायबेरियन ध्वज असणारे टँकर १ मार्च रोजी सौदी अरेबियाच्या रास तनुरा बंदरातून १३५३३५ मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन रवाना झाले. ८ मार्च रोजी या टँकरने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश केला, परंतु त्यानंतर जहाजावरील कर्मचाऱ्यांनी अनिवार्य असलेले एआयएस ट्रान्सपाँडर (AIS transponder) बंद केल्यामुळे ते पब्लिक ट्रॅकिंग सिस्टमवरून गायब झाले.
स्टँडर्ड मॅरिटाइम मॉनिटरिंगसाठी अदृश्य असलेले जहाज दुसर्या दिवशी सामुद्रधुनीच्या दुसऱ्या बाजूला पोहोचले होते आणि त्यानंतर ११ मार्च रोजी ते मुंबई बंदरात दाखल झाले. मध्यपूर्वेत संघर्ष पेटल्यापासून सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर पडलेले हे पहिले भरताचे पहिले कच्च्या तेलाचे जहाज होते.
जहाज येथून बाहेर पडले ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. इराणने अमेरिका, युरोप आणि इस्रायल यांच्याशी संबंधित जहाजे यशस्वीपणे रोखली, इतकेच नाही तर परवानगीशिवाय येथून जाणाऱ्या जहाजांना इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअर (आयआरजीसी) कडून लक्ष्य करणअयात आले. इराणच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ‘एक्सप्रेस रोम’ आणि ‘मयुरी नारी’ या दोन जहाजांवर हल्ला करण्यात आला. येथून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला इराणकडून परवानगी घ्यावी लागेल असे आयआरजीसीच्या नौदल कमांडरने स्पष्ट केले आहे.
कियोसाकी यांच्या मते, भारताने बळाचा वापर करण्याऐवजी डिप्लोमसीच्या जोरावर सुरक्षित मार्ग मिळवला. “मग भारताला हा मार्ग कसा मिळाला?” असे लिहित कियोसाकी यांनी “फक्त तीन फोन कॉल्स,” असेही नमूद केले.
ते पुढे लिहीतात की, “भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आत्तापर्यंत गेल्या दोन आठवड्यांमध्ये तीन वेळाइराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी थेट संवाद साधला- २८ फेब्रुवारी, ५ मार्च, आणि १० मार्च.”
या दोन नेत्यांमधील चर्चा ही भारतीय जहाजांची सुरक्षितता आणि ऊर्जा सुरक्षेवर केंद्रित होती, ज्याचा परिणाम म्हणून इराने भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना परवानगी दिली. ‘शेनलाँग’ या जहाजाच्या नंतर ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ या आणखी दोन टँकर्सनी ही सामुद्रधुनी यशस्वीपणे ओलांडली आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, “अमेरिकन जहाजे: रोखली गेली, युरोपियन जहाजे: रोखली गेली, इस्रायलशी संबंधित जहाजे: लक्ष्य केली गेली, भारतीय जहाजे: सोडण्यात आली,” असे ते म्हणाले.
आकडेवारी पाहिली तर भारताच्या एकूण आयातीपैकी अर्ध्यापेक्षा जास्त कच्चे तेल आणि गॅस हे या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गाने आयात केले जाते, या मार्गाने साधारणपणे दररोज २० दशलक्ष बॅरल तेलाची वाहतूक केली जाते. कियोसाकी यांच्या मते, होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर ग्लोबल एमर्जन्सी ऑईल रिझर्व्ह मधून ४०० बॅरल तेल सोडल्यानंतरही कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या नाहीत, अशा परिस्थितीत कोणत्याही संघर्षात सहभागी न होता भारताने मिळवलेले राजनैतिक यश हे राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेच्या रक्षणासाठी मिळवलेला एक धोरणात्मक विजय आहे.
“आणि भारताने फक्त वाटाघाटीतून एक स्वत:ची खाजगी लेन मिळवली आहे. लष्करी बळाने नाही. निर्बंधातूनही नाही. तर डिप्लोमसीतून. सध्या पर्शियन आखातात २८ भारतीय ध्वज असलेली जहाजे कार्यरत आहेत. ६७७ भारतीय नाविक सामुद्रधुनीच्या पश्चिमेला आहेत, भारत सरकार २८ फेब्रुवारीपासून २४ तास नियंत्रण कक्ष चालवत आहे आणि त्यातील प्रत्येकावर देखरेख ठेवली जात आहे.” असे कियोसाकी यांनी लिहिले.
त्यांच्या मते या सक्रिय दृष्टिकोनामुळे फक्त त्यांच्या जहाजांचा सुरक्षित प्रवासच शक्य झाला नाही, तर भारताच्या बंदरांपर्यंत होणारा महत्त्वाचा कच्च्या तेलाचा पुरवठा देखील विनाअडथळा सुरू राहिला. “त्यांच्याकडे गमावण्यासारखे बरेच काही होते. आणि त्यांनी त्याचे रक्षण केले, तेही एकही गोळी न झाडता,” असे कियोसाकी म्हणाले.
