केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि जर्मनीचे व्हाइस चान्सलर रॉबर्ट हॅबेक यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. दोन्ही नेते दिल्ली मेट्रोतून प्रवास करतानाचं हे संभाषण आहे. यावेळी पीयूष गोयल हे टनेल बोरिंग मशिन्सच्या खरेदीबाबत बोलताना दिसून येत आहेत. तसेच यावेळी त्यांनी भारत जर्मनीकडून या मशिनांची खरेदी थांबवेल अशी तंबीही हॅबेक यांना दिली. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
रॉबर्ट हॅबेक हे जर्मन सरकारमधील मंत्री असून ते भारताच्या दौऱ्यावर आहेत. नुकताच त्यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याबरोबर दिल्ली मेट्रोने प्रवास केला. यावेळी दोन्ही नेते जर्मन कंपनीकडून टनेल बोरिंग मशीन्स खरेदीबाबत बोलत होते. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ‘लॉर्ड बेबो’ नावाच्या यूजर्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
पीयूष गोयल नेमकं काय म्हणाले?
भारत चीनमधीन एका जर्मन कंपनीकडून टनेल बोरिंग मशीन्स खरेदी करण्याच्या विचारात आहे. मात्र, चीनने या मशिनींच्या विक्रीवर रोख लावली आहे. यामुळे आमच्या देशातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असं पीयूष गोयल यांनी हॅबेक यांना सांगितलं. तसेच आता भारताने जर्मन उपकरणांची खरेदी करणे थांबवले पाहिजे, अशी तंबीही त्यांनी दिली. पीयूष गोयल यांच्या तंबीनंतर हॅबेक तडकफडकी उभे राहिले आणि मला वाटतं की मी तुमचं ऐकलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, पीयूष गोयल ज्या मशीन्सबाबत बोलत आहेत, त्या मशीन्सचा वापर डोंगर पोखरून टनेल बनवण्यासाठी केला जातो. भारतात अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प यासह देशातील अनेक प्रकल्पांमध्ये या टनेल बोरिंग मशिन्सचा वापर केला जातो आहे.