कायम वादग्रस्त विधानांमुळे आणि खळबळजनक भविष्यवाणीमुळे चर्चेत असलेला अभिनेता तसेच स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरकेने भारत-पाकिस्तान सामन्यानंतर काही ट्विट केली आहेत. या ट्विट्समध्ये केआरकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबरोबरच सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेला अभिनेता अक्षय कुमारवरही निशाणा साधलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत पाक सामन्याआधी केआरकेने भारत सामना जिंकेल असं मत व्यक्त केलेलं. “भारत आणि पाकिस्तानमधील सामना हा काही सामना नाही…ही तर फक्त एक थट्टा आहे. पूर्ण जगाला माहितेय की भारतच सामना जिंकणार,” असं तो म्हणाला होता. मात्र सामन्यामध्ये अगदी उलट गोष्ट घडली. फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यानंतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली. पाकिस्तानी संघाची ही कामगिरी पाहून केआरके थक्क झालाय.

“आज मी पाकिस्तानी संघाला जवळजवळ पाच ते सहा वर्षांनी मैदानात खेळताना पाहतोय. त्यामुळे मला ते एवढं चांगलं खेळतात हे ठाऊक नव्हतं. म्हणूनच मी जुहूमधील गल्ली टीमशी केलेल्या त्यांच्या तुलनेसाठी माफी मागतो,” असं तो एका ट्विटमध्ये म्हणालाय.

“मला ठाऊक नव्हतं की बाबर आझम हा आयसीसी टी २० रॅकिंगमध्ये जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच २१ वर्षीय शाहीन आफ्रिदी एवढा खतरनाक गोलंदाज असल्याचंही ठाऊक नव्हतं. बाबर हा विराटपेक्षा मोठा खेळाडू आहे हे अविश्वसनीय आहे,” असंही कमाल आर खानने म्हटलंय.

सामना पाहण्यासाठी अक्षय कुमावरही केआरकेने टीका केलीय. “अक्षय कुमार तू भारत पाक सामना पाहण्यासाठी मैदानावर का गेलास? तुझी नकारात्मकता त्यात विराट कोहलीची नकारात्मकता म्हणजे पाकिस्तानचा १० विकेट्सने विजय,” असा खोचक टोलाही कमाल आर खानने लगावलाय.

“मला विश्वास बसत नाहीय की पनौती हा शब्द अक्षय कुमार सरांमुळे चर्चेत आहे. सर तुम्ही तर चर्चेत आलात,” असंही कमाल आर खानने म्हटलंय.

विराट कोहलीवर निशाणा साधताना कमाल आर खानने विराटने भारताचं नाक कापल्याची टीका केलीय. “तू आजच कर्णधारपदाचा राजीनामा दे”, असंही कमाल आर खानने म्हटलंय.

तसेच, “आजच्या सामन्यामुळे विराट कोहली हा फार वाईट कर्णधार असून भारतीय संघ कमकुवत आहे हे सिद्ध झालंय,” असंही कमाल आर खान म्हणालाय. याच कारणामुळे भारत यंदा टी २० विश्वचषक जिंकणार नाही असंही त्याने म्हटलं आहे.

या पराभवानंतर केआरकेने पंतप्रधान मोदींचा हाताची घडी घालून असलेला एक फोटो ट्विट करत मोदींवरही निशाणा साधलाय. “मोदी सर जे याआधी कधीच झालं नाही ते सुद्धा तुमची सत्ता असताना घडलंय. मोदी है तो मुमकिन है, असं केआरकेने म्हटलं आहे.

सोशल नेटवर्किंगवर मागील काही काळापासून सरकारच्या अनेक जाहिरातींवर मोदींचा फोटो हा तुलनेने मोठा असल्याबद्दल आक्षेप घेतला जात असल्याचं चित्र दिसतं. अगदी लसीकरणापासून ते ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या सत्कारापर्यंत सर्व ठिकाणी मोदींचा हाताची घडी घातलेला मोठ्या आकारातील फोटो छापल्याचं दिसत. हा फोटो मिम्समध्येही अनेकदा वापरण्यात आलाय. याच सिरीजमध्ये केआरकेनेही मोदींना या पराभावचं क्रेडिट देत टीका केल्याचं पहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs pakistan actor kamal r khan krk share pm modi poster after t20 world cup match scsg
First published on: 25-10-2021 at 10:03 IST