‘ग्राहक हा देव असतो’ हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ग्राहकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला तर एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय यशस्वी होण्यास मदत मिळते. पण जर त्याच ग्राहकांनी पाठ फिरवली तर व्यवसाय ठप्प होऊ शकतो. त्यामुळे सर्वकाही ग्राहकांच्या हातात आहे, असे अनेकजण मानतात आणि त्यानुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करतात. इतकच नाही तर ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे स्वतःच्या नियमांमध्ये बदल करतात. याउलट तुम्ही ग्राहकांनी कसे वागावे याबाबत नियम बनवण्यात आलेले पाहिले आहे का? सध्या व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये तुम्हाला हे पाहता येईल.

सोशल मीडियावर एका चहाच्या दुकानातील पाटीचा फोटो व्हायरल होत आहे. हे चहाचे दुकान इंग्लंडमधील एक भारतीय दुकान आहे, याचे नाव ‘चाय स्टॉप’ आहे. या दुकानात एक नवा नियम बनवण्यात आला आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकाकडुन तो ऑर्डर कशा पद्धतीने देतो यावरून त्यांच्या कडुन पैसे आकारले जाणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीने उद्धटपणे ऑर्डर दिली तर त्या व्यक्तीला दुप्पट पैसे द्यावे लागणार. या नियमानुसार किंमत स्पष्ट करणारी एक पाटी लावण्यात आली आहे. ही पाटी इन्स्टाग्रामवर देखील शेअर करण्यात आली आहे. काय आहेत यातील किंमती पाहा.

इन्स्टाग्राम पोस्ट :

या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिसणाऱ्या पाटीवर – ‘देशी चहा’ अशी ऑर्डर दिल्यास £5 इतके रुपये द्यावे लागतील, ‘देशी चहा प्लिज’ अशी ऑर्डर दिल्यास £3 आणि ‘हॅलो देशी चहा प्लिज’ अशी ऑर्डर दिल्यास £1.90 इतके पैसे द्यावे लागतील, असे लिहण्यात आले आहे. या नियमामुळे ग्राहक तिथल्या कर्मचाऱ्यांशी चांगल वागतील अशी अपेक्षा असल्याचे दुकानाचे मालक हुसेन यांनी ‘डेली मेल’शी बोलताना सांगितले. अनोखी कल्पना असणारी ही पाटी सध्या व्हायरल होत असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.