पंजाबमध्ये सुरू असलेलं राजकीय नाट्य सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. एकीकडे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिलेला असताना त्यांच्याशी टोकाचे मतभेद असणारे नवजोत सिंग सिद्धू यांनी देखील पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या प्रकारातच संबंधित नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोप करत असताना यामुळे भारतीय फुटबॉल संघाचा गोलकीपर मात्र वैतागला आहे. त्यामुळे त्यानं चक्क ट्वीटरचा आसरा घेत नेटिझन्सला कळकळीची विनंती केली आहे.

मी अमरिंदर सिंग, पण…

पंजाबचेम माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासोबत नामसाधर्म्यामुळे भारतीय फुटबॉल संघाचा गोलकीपर वैतागला आहे. कारण त्याचं नाव देखील अमरिंदर सिंग असंच आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविषयी ट्वीट करताना बरेच नेटिझन्स, माध्यमातील काही लोक अमरिंदरला टॅग करत आहेत. त्यामुळे अखेर अमरिंदर सिंगला ट्वीट करत या सगळ्याचा खुलासा करावा लागला.

अमित शाह भेटीनंतर भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर अमरिंदर सिंग यांनी सोडलं मौन; म्हणाले, “मी भाजपात…”

यासंदर्भात अमरिंदर सिंगनं गुरुवारी सकाळी एक ट्वीट करून माहिती दिली आहे. “प्रिय माध्यमकर्मी, पत्रकार. मी अमरिंदर सिंग, भारतीय फुटबॉल संघाचा गोलकीपर आहे. आणि मी पंजाबचा माजी मुख्यमंत्री नाही. कृपया मला टॅग करणं थांबवा”, असं अमरिंदर सिंगनं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पंजाबमध्ये राजकीय कलह

१८ सप्टेंबर रोजी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दोन आठवड्यांच्या आत नवजोत सिंग सिद्धू यांनी देखील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पंजाबमध्ये सध्या राजकीय कलहाचं वातावरण निर्माण झालं आहे. अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर तर या तर्क-वितर्कांना अजूनच उधाण आलं आहे. अमरिंदर सिंग यांनी मी भाजपामध्ये जाणार नाही, काँग्रेससोबत राहणार नाही असं जाहीर केल्यामुळे ते नेमकं पुढे काय करणार आहेत, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे नवजोतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्याशी चर्चेची तयारी दर्शवली आहे.