आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे जिथे प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केली जाते. जगाच्या काना कोपऱ्यात घडणाऱ्या गोष्टी क्षणार्धात जगभर पोहचल्या जातात. सोशल मीडियावर सतत पोस्ट काही ना काही पोस्ट करत राहणे हा नवा ट्रेंड झाला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करताना दिसतात पण कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते. अनेकदा लोक या मर्यादा विसरून जातात. सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ पोस्ट करणे हा नवा ट्रेंड झाला आहे पण काही लोक जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवण्याच्या लोभात आपण कुठे व्हिडीओ शुट करत आहोत हे देखील बघत नाही. कधी रहदारीच्या रस्त्यावर, कधी मेट्रोमध्ये, कधी धावत्या रेल्वेत किंवा गजबजलेल्या स्थानकावर, कधी रेल्वेच्या छतावर तर कधी गाडीच्या छतावर चढून…नियमांचे उल्लंघन करत हे लोक डान्स करताना किंवा स्टंटबाजी करताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते हे माहित असूनही अनेकदा लोकांना याचा विसर पडतो. असाच काहीचा प्रकार अमेरिकेत घडला आहे जिथे भारतीय वंशाचा तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी डान्स केला आहे आहे पण त्यांच्यावर आता हद्दपार होण्याची वेळ आली आहे.
झाले असे की, अमेरिकेतील दुसऱ्या महायुद्धाच्या स्मारकासमोर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय वंशाच्या एका तरुणांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर टीकेचा भडिमार झाल्यानंतर संबंधित तरुणाने आपली अनेक सोशल मीडिया अकाऊंटस् डिलिट केली आहेत.
स्मारकासमोर नृत्याचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथील ‘नॅशनल वर्ल्ड वॉर टू मेमोरियल’ परिसरात एका तरुणाने नृत्य केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या तरुणाची ओळख मधू राजू अशी सांगितली जात आहे. व्हिडिओमध्ये तो एका महिलेबरोबर स्मारकासमोर कोरिओग्राफ केलेला डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मूळतः टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर तो वेगाने व्हायरल झाला आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. हे स्मारक दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेसाठी लढलेल्या सुमारे १.६ कोटी सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे. तसेच या युद्धात मृत्यू झालेल्या चार लाखांहून अधिक सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे स्मारक महत्त्वाचे मानले जाते.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या कृत्यावर टीका केली. अनेकांच्या मते, अशा स्मारकस्थळी मनोरंजनासाठी किंवा सोशल मीडिया व्हिडिओंसाठी नृत्य करणे अयोग्य आहे.
काही जणांनी हे ठिकाण “बलिदान आणि स्मरणाचे प्रतीक” असल्याचे सांगत तेथे अशा प्रकारचा व्हिडिओ बनवणे असंवेदनशील असल्याचे म्हटले. काहींनी तर परदेशात राहणाऱ्या स्थलांतरितांनी सार्वजनिक ठिकाणी अधिक शिस्त पाळली पाहिजे, असेही मत व्यक्त केले. एका वापरकर्त्याने भारतातील सुमारे २५ लाख सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतल्याची आठवण करून देत अशा स्मारकांबद्दल आदर राखणे आवश्यक असल्याचे लिहिले.
नोकरी आणि डान्स स्टुडिओबाबत दावे
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर काही जणांनी संबंधित व्यक्तीची ओळख मधू राजू अशी सांगितली. तसेच तो अमेरिकेतील एका सायबरसिक्युरिटी कंपनीत क्लाउड नेटवर्क सिक्युरिटी इंजिनिअर म्हणून काम करत असल्याचा दावा करण्यात आला. काही पोस्टमध्ये तो ‘MAD Dallas’ नावाचा डान्स स्टुडिओ चालवत असल्याचाही दावा करण्यात आला. वाद वाढल्यानंतर त्या स्टुडिओची वेबसाइट आणि सोशल मीडिया पेजेस बंद करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजूने लिंक्डइन, इंस्टाग्राम आणि इतर काही सोशल मीडिया अकाउंट्स हटवल्याचेही सांगितले जात आहे.
व्हिसावर परिणाम होण्याची शक्यता
सध्या अमेरिकन अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची प्राथमिक पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. राजू अमेरिकेत नॉन-इमिग्रंट व्हिसावर राहत असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या स्थलांतर कायद्यांनुसार काही विशिष्ट नियमांचे उल्लंघन झाल्यास व्हिसा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. स्मारक परिसरात परवानगीशिवाय कार्यक्रम, प्रदर्शन किंवा शूटिंग करणे नियमांच्या विरोधात ठरू शकते.
भारतीय-अमेरिकन समुदायात मतभेद
या घटनेवर भारतीय-अमेरिकन समुदायात मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी या कृत्यावर टीका केली असली, तरी केवळ एका व्हिडिओमुळे एखाद्याला देशाबाहेर पाठवण्याची मागणी अतिशयोक्तीपूर्ण असल्याचेही काहींचे मत आहे. दरम्यान, मधू राजूने या घटनेबद्दल माफी मागितल्याचेही काही अहवालांमध्ये म्हटले आहे. त्याचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्याने स्पष्ट केल्याचे सांगितले जाते. तथापि, या प्रकरणाबाबत अंतिम निर्णय येत्या काही आठवड्यांत सुनावणी झाल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी काही भारतीयांनी बुर्ज खलिफाला भेट दिल्यानंतर तिथे जाऊ गरबा नृत्य केले होते तर काहींनी थेट एअरपोर्टवर गरबा नृत्य सुरू केले होते. डान्स करण्यात चुकीचे नाही पण आपण कुठे डान्स करत आहोत, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो याचे भान राखले पाहिजे हाच संदेश हा व्हिडीओ देत आहे.
