आपलं लाईफ ठरलेलं असतं ना? अभ्यास करायला खेळ टाळायचे. लग्न झालं की स्वत:चं स्वतंत्र अस्तित्त्व टाळायचं. आणि नोकरी लागली की बाकी जीवनच टाळायचं याच चक्रात सबंध आयुष्य अडकलेलं असतं. ‘काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं’ वाक्याचा शब्दश: अर्थ घेणारे आपण सगळे एकदा नोकरी लागली की बाकी काही करायचं उरलेलं नसल्याच्या थाटात आयुष्य काढतो.

आता आपणा भारतीयांच्या नेमक्या याच प्रवृत्तीवर बोट ठेवलं ते एका संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये ‘मिंटेल’ या संस्थेने केलेल्या या सर्व्हेमध्ये आपण भारतीय कमालीचे ओव्हरवर्क्ड आहोत असं समोर आलंय. आयुष्यातल्या बऱ्याच महत्त्वाच्या आणि सुंदर बाबींकडे दुर्लक्ष करत घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे कामाच्या मागे धावतो. का? तर आपण नोकरी करायला सुरूवात केल्यानंतर काही ३० वर्षांनी आपल्याला आपलं जीवन सुखी झालेंलं पहायचं असतं. पण हे करताना आपण आपला वर्तमानकाळ अतिशय तणावाचा करतोय याची आपल्याला जाणीव असते का?
‘मिलेनियल’ जनरेशन म्हणजेच ज्यांचा जन्म १९८० ते २००० दरम्यान झाला आहे अशा तरूण प्रोफेशनल्सच्या बाबतीत हा प्राॅब्लेम खूपच भीषण रूप धारण करतोय. अतिशय महत्त्वाकांक्षी असणारे अनेकजण आठवड्याला ६० तासांपेक्षा जास्त काम करतात. अनेक सर्व्हेंमध्ये आठवड्याला ६० तासांपेक्षा जास्त काम केल्यावर तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे स्पष्टपणे आढळून आलं आहे. पण तरीही याकडे दुर्लक्ष करत भारतीय प्रोफेशनल्स मरेमरेस्तोवर काम करतात.

‘वर्क-लाईफ बॅलन्स’ नावाचाही काही प्रकार असतो याकडे आपलं सगळ्यांचं बहुधा दुर्लक्षच होतं. कदाचित आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने नोकऱ्या जाण्याची एक अनाहूत भीती आपल्या सगळ्यांच्या मनात आणि एकूण समाजातच असावी. त्यामुळे हातात आहे ती नोकरी जिवाच्या आकांताने करण्याची प्रवृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये आपसूकच येत असावी

पण भविष्यकाळाची चिंता करता करता एवढंही स्वत:ला ताणू नये की या सगळ्या गोंधळात वर्तमानच संपून जाईल.