Indian Railway Viral Video : काही वेळा परिस्थितीमुळे माणसाला असे काही निर्णय घ्यावे लागतात की, ज्याचा विचार करणेही कठीण असते. सध्या अशीच एक वस्तुस्थिती दर्शविणारा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ केवळ धक्कादायकच नाही, तर यातून आपल्या समाजात असा एक वर्ग आहे, जो रोज ही परिस्थिती अनुभवतोय. व्हिडीओत दोघे जण धावत्या ट्रेनच्या दरवाजाबाहेर लटकलेत; पण ते अशा स्थितीत लटकत उभे आहेत की, पाहून तुम्हालाही काळजी वाटेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, दोन जण धावत्या ट्रेनच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला लटकून आपला जीव धोक्यात घालत असल्याचे दिसत आहे. आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की, ट्रेनला धरून राहण्यासाठी एखाद्या मजबूत आधाराऐवजी त्यांनी एका साध्या टॉवेलचा आधार घेतला आहे. त्यांनी तो टॉवेल ट्रेनमध्ये चढण्यासाठी दोन्ही बाजूंना असलेल्या हँडलला बांधलाय. त्याचा आधार घेऊन, ते धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभे राहिले होते. अशा प्रकारे ते गंतव्य स्थानापर्यंत पोहोचणार होते.

ट्रेन इतकी खचाखच भरलेली होती की, आत उभे राहायलाही जागा नव्हती. प्रत्येक कोपरा प्रवाशांनी खचाखच भरलेला होता आणि लोक आधीच दारांवर उभे होते. अशा परिस्थितीत त्या व्यक्तींना ट्रेनमध्ये चढण्यास जागा मिळेल याची काहीच शक्यता नव्हती. पण, त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या गंतव्य स्थानी पोहोचायचे होते म्हणून त्यांनी हा धोकादायक मार्ग अवलंबला.

काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

व्हिडीओमध्ये ते दोन जण ट्रेनच्या बाहेरच्या बाजूला सावधपणे लटकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि असहायता दोन्ही दिसत आहेत. तो टॉवेल घट्ट पकडून, खाली पडू नये म्हणून ते आपला तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रेन प्रचंड वेगाने धावत आहे आणि एक छोटीशी चूकही त्यांना आपला जीव गमवावा लागू शकतो. पण, ट्रेन एका स्थानकावर पोहोचताच पोलीस त्या दोघांना अडवतात आणि टॉवेल सोडून दरवाजापासून दूर होण्यास सांगतात. हे दृश्य कोणाच्याही काळजाचा ठोका चुकवायला पुरेसे आहे.

ही घटना केवळ एका व्हिडीओपुरती मर्यादित नाही, ती आपल्या देशातील सार्वजनिक वाहतुकीचे वास्तव दर्शवते. दररोज मोठ्या संख्येने लोक काम, शिक्षण आणि इतर अत्यावश्यक गरजांसाठी रेल्वेवर अवलंबून असतात. विशेषतः लहान शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये रेल्वे हे वाहतुकीचे सर्वांत स्वस्त आणि सोईस्कर साधन आहे. पण, वाढती लोकसंख्या आणि मर्यादित संसाधनांमुळे रेल्वेतील गर्दी सातत्याने वाढत आहे.