Indian Railways TTE Rules: भारतीय रेल्वेत प्रवास करताना बहुतांश प्रवाशांना TTE (Travelling Ticket Examiner) म्हणजे फक्त तिकीट तपासणारा अधिकारी अशीच माहिती असते. मात्र प्रत्यक्षात TTE ची जबाबदारी केवळ तिकीट तपासण्यापुरती मर्यादित नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेपासून महिलांसाठी राखीव जागांचे संरक्षण, वैद्यकीय आपत्कालीन मदत, अतिरिक्त सामानाची तपासणी आणि अनधिकृत प्रवाशांना रोखण्यापर्यंत अनेक महत्त्वाची कामे त्यांच्याकडे असतात. भारतीय रेल्वेने याबाबतचे नियम स्पष्ट केले आहेत.

TTEची मुख्य जबाबदारी काय असते?

TTEचे प्रमुख काम म्हणजे प्रत्येक प्रवाशाकडे वैध तिकीट किंवा पास आहे का, याची खात्री करणे. याशिवाय ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणे, अनधिकृत प्रवाशांना डब्यात प्रवेश करू न देणे आणि प्लॅटफॉर्म तिकीटधारकांना प्रवास करण्यापासून रोखणे ही देखील त्यांची जबाबदारी असते.

फक्त तिकीट तपासणीच नाही, TTE ला करावी लागतात ‘ही’ १२ महत्त्वाची कामे

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार TTE कडे खालील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात:

  • स्वच्छ गणवेश, ओळखपत्र आणि नेमप्लेटसह ड्युटीवर उपस्थित राहणे.
  • प्रवास सुरू होण्यापूर्वी आरक्षणाची संपूर्ण माहिती घेऊन सीट व बर्थची नोंद ठेवणे.
  • प्रवाशांची तिकीट तपासणी करून त्यांना योग्य जागेवर बसवणे.
  • डब्यात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करू न देणे.
  • डब्यातील प्रवाशांची संख्या निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घेणे.
  • अतिरिक्त भाडे, आरक्षण शुल्क किंवा दंड आकारून त्याची अधिकृत पावती देणे.
  • ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास ते लगेज व्हॅनमध्ये पाठवण्याची व्यवस्था करणे.
  • मधल्या स्थानकांवर रिकाम्या जागांचे वाटप ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ किंवा वेटिंग लिस्टनुसार करणे.
  • महिलांसाठी राखीव बर्थ किंवा सीटवर पुरुष प्रवाशांना बसू न देणे.
  • गाडी सुरू असताना डब्याचे दरवाजे सुरक्षितपणे बंद असल्याची खात्री करणे.
  • रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत व्हेस्टिब्युल ट्रेनमधील शेवटचे दरवाजे लॉक ठेवणे.
  • चोरीची घटना घडल्यास प्रवाशांना FIR फॉर्म उपलब्ध करून देणे आणि पुढील GRP ठाण्यात तो जमा करण्याची व्यवस्था करणे.

प्रवाशांच्या आरोग्याची जबाबदारीही TTE वर

प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्यास TTE ने तातडीने पुढील रेल्वे स्थानक किंवा कंट्रोल ऑफिसला माहिती देणे आवश्यक असते. त्यामुळे जवळच्या रुग्णालयाची सुविधा असलेल्या स्थानकावर वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली जाते.

धूम्रपान आणि धोकादायक वस्तूंवरही लक्ष

TTE ला रेल्वेत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. तसेच ज्वलनशील, धोकादायक किंवा प्रतिबंधित वस्तू आढळल्यास त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देणेही त्यांच्या कामाचा भाग आहे.

एका ट्रेनमध्ये किती TTE असतात?

रेल्वेच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार TTE ची संख्या ट्रेनमधील डब्यांच्या प्रकारानुसार ठरवली जाते.

५ एसी डब्यांपर्यंत – १ TTE
३ चेअर कार किंवा स्लीपर डब्यांपर्यंत – १ TTE

यामुळे तिकीट तपासणीबरोबरच प्रवाशांना आवश्यक ती मदत वेळेवर मिळावी, असा उद्देश असतो.

रेल्वेने केले बदल

उपलब्ध मनुष्यबळाचा अधिक परिणामकारक वापर करण्यासाठी भारतीय रेल्वेने विविध झोनना TTE च्या ड्युटीचे पुनर्नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यकतेनुसार इतर रेल्वे विभागांशी समन्वय साधणे, TTE च्या ड्युटीचा कार्यक्षेत्र वाढवणे आणि तिकीट तपासणी पथकांमधील मनुष्यबळाचे पुनर्वाटप करणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत.

प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती

पुढच्या वेळी रेल्वेत प्रवास करताना TTE दिसल्यास ते केवळ तिकीट तपासण्यासाठी आले आहेत असे समजू नका. प्रवासादरम्यान सीट, आरक्षण, अतिरिक्त सामान, वैद्यकीय मदत, महिलांच्या राखीव जागा किंवा इतर अनेक अडचणींसाठी TTE हा तुमचा अधिकृत संपर्क अधिकारी असतो. त्यामुळे गरज पडल्यास त्यांच्याकडे मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका.