Heartbreaking struggle of an Indian student in USA facing job rejection and financial crisis : अनेक भारतीयांसाठी अमेरिकेला जाणे म्हणजे ती एकप्रकारे प्रगतीची संधी असते, तिथे जाऊन पदवी घ्यायची, पैसा कमावायचा आणि परत मायदेशी आल्यावर येथे चांगल्या संधी मिळवायच्या… पण ४३ वर्षीय बिझनेस कन्सलटंट मनोज (नाव बदललेले आहे) भारतात परतण्याचा अनुभव हा पूर्णपणे वेगळा होता. ‘द फायनान्शिअल एक्सप्रेस’शी आपला अनुभव शेअर करताना त्याने सांगितले की, हे परदेशातून परत येणे हे चार वर्षांच्या सततचा संघर्ष, डोक्यावर असलेले ४०००० डॉलर्सचे कर्ज , डळमळीत झालेला आत्मविश्वास आणि शांतपणे विरून गेलेले एक स्वप्न यापासून दूर येण्यासारखे होते.

मनोजचा अमेरिकेचा प्रवास कोरोना महामारीच्या काळात सुरू झाला. त्या वेळी भारतात त्याने नोकरी गमावली होती आणि अनेक महिने प्रयत्न करूनही त्याला दुसरी नोकरी मिळत नव्हती. बेरोजगारीचा हा कालावधी त्याच्यावर ओझे बनत चालल होता.

मनोजला बिझनेस कन्सलटिंग क्षेत्रात सुमारे दहा वर्षांचा अनुभव होता, पण त्यावेळच्या जॉब मार्केटमधून त्याला फारसा दिलासा मिळत नव्हता. शेवटी, त्याने आपले स्किल अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आणि एका कोर्ससाठी प्रवेश घेतला. याच काळात अमेरिकेत शिक्षण घेण्याची विचार त्याला नवी सुरूवात करण्याची संधी वाटू लागला .त्याने मान्य केले की हा निर्णय सोपा नव्हता. वयाच्या ४३ व्या वर्षी ही एक मोठी जोखीम आहे, याची त्याला जाणीव होती. तरीही अमेरिकेतील मित्र आणि काउंसलर्स बरोबर झालेल्या चर्चेनंतर त्याचा आत्मविश्वास बळावला.

“माझ्या वयात हे जोखमीचे आहे हे मला माहिती होते,” असे मनोजने सांगितले. “पण मित्र, अॅल्युमनी आणि काउंसलर्स बरोबर बोलल्यानंतर, प्रत्येकजण म्हणाला की तेथे संधी आहेत. मी त्यावर विश्वास ठेवला.”

“लवकरच, मनोज अमेरिकेच्या इस्ट कोस्ट येथील एका विद्यापीठात दाखल झाला. जेव्हा तो पदवीधर झाला, तेव्हा त्याचा जीपीए ३.९ होता, ज्याबद्दल त्याला अभिमान वाटत होता. त्या वेळी त्याला असे वाटले की आयुष्यातील सर्वात कठीण काळ आता मागे सरला आहे. पण पदवी मिळवणे ही एका यापेक्षा जास्त अवघड टप्प्याची फक्त सुरुवात होती, याची जाणीव त्याला लवकरच झाली.

“खरं तर शिक्षण घेणं हा सर्वात सोपा भाग होता,” असे तो म्हणाला. पुढची तीन वर्षे मनोजने आपला बहुतेक वेळ नोकरीसाठी अर्ज करण्यात घालवला. अखेरीस या अर्जांची संख्या १० हजारच्या वर गेली. “मी अतिशयोक्ती करत नाहीये,” असेही त्याने सांगितले.

इतक्या प्रचंड प्रयत्नांनंतरही, त्यातून फारसे काही साध्य झाले नाही. मनोजने सांगितलं की, त्याला एकूण फक्त सात किंवा आठ मुलाखतींसाठी बोलावण्यात आले आणि त्यापैकी चार वेळा तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. शेवटी एका कंपनीने त्याला कामावर घेतले आणि अखेर परिस्थिती सुधारत असल्याचे वाटू लागले. पण ती नोकरी टिकली नाही. “मध्येच त्यांनी आपल्याला एका आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याबाबत जोखीम पत्करायची नाही असा निर्णय घेतला,” असे तो म्हणाला. “त्यामुळे माझी ती नोकरीही गेली,” असे त्याने सांगितले. दुसरीकडे त्याच्या अनेक रूममेट्सना पदवी मिळाल्यानंतर आठ महिन्यांच्या आतच नोकऱ्या मिळाल्या होत्या.

अमेरिकेत राहण्यासाठी छोटी-मोठी कामे केली

जसे काळ उलटत गेला आणि नकार मिळतंच राहिले तसे मनोजला आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मार्ग शोधावे लागले. जिथे काम मिळेल तिथे त्याने छोटी-मोठी कामे करण्यास सुरुवात केली. या काळात त्याने कधीकधी सुमारे ४० डिग्री तापमानात तासनतास उभे राहून क्रिकेट सामन्यांचे अंपायरिंग देखील केले. तर इतर दिवसांत, जे काही काम मिळेल ते तो करत असे.

“कधीकधी मी दिवसातून १२ ते १४ तास काम करायचो,” असे त्याने सांगितले. “तो पूर्णपणे सर्व्हावल मोड होता,” असेही तो म्हणाला. इतक्या कष्टानंतरही, त्याने शिक्षणासाठी घेतलेले शैक्षणिक कर्ज तो फेडू शकला नाही. या तणावाचा परिणाम हळूहळू त्याच्यावर होऊ लागला. “अखेर मी मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या बर्नआऊट झालो होतो,” असे तो म्हणाला.

भारतात परतल्यावर वेगळंच वास्तव

भारतात परतणे ही मनोजसाठी त्याने अपेक्षित केलेली एक नवीन सुरुवात नव्हती. परत आल्यानंतर अनेक महिने उलटूनही तो अजूनही नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करत आहे, पण त्याला अद्याप यश मिळालेले नाही. आर्थिक दडपण अजूनही कायम आहे, पण त्याच्यासाठी या संपूर्ण अनुभवाचा त्याच्या मनावर झालेला परिणामा हा जास्त त्रासदायक आहे.

वयाच्या ४३ व्या वर्षी, तो आता आर्थिक आधारासाठी आपल्या आईवर अवलंबून आहे. “मी वयाच्या ४३ व्या वर्षी पैशांसाठी माझ्या आईवर अवलंबून आहे. मी कधीच अशी कल्पना केली नव्हती,” असे तो म्हणाला. या अनुभवाने त्याचा आत्मविश्वासही पूर्णपणे डळमळीत केला आहे. “माझा आत्मविश्वास हीच माझी ताकद होती, आता मला असे वाटते की माझा स्वतःवरचा विश्वासच उडाला आहे,” अशा भावना मनोजने पुढे बोलताना व्यक्त केल्या.

या संघर्षामध्ये त्याच्या वयाची मोठी भूमिका असावी, असे त्याला वाटते. चाळीशीत असलेल्या एका आंतरराष्ट्रीय पदवीधरासाठी एंट्री-लेव्हल पदांसाठी प्रयत्न करतो आहे, यामुळे एकंदरीत संपूर्ण प्रक्रिया अजूनच जास्त कठीण होते.

अनुभवातून काय धडा घेतला?

मागे वळून पाहताना मनोज सांगतो की या प्रवासाने त्याला अनेक गोष्टी शिकवल्या. “मी असे गृहित धरले होते की नोकरी मिळाल्यावर मी माझे कर्ज फेडेन, आता विचार करताना वाटते की, मी कर्ज कमी करण्यासाठी माझ्या शिक्षणादरम्यान अधिक काम करायला हवे होते,” असे तो म्हणाला.

फक्त शैक्षणिक यश मिळवण्याने नोकरीची हमी मिळत नाही, याचीही जाणीवही त्याला झाली. “पदवी ही स्वतः एक दुय्यम गोष्ट आहे, तुम्ही कुठून पदवी मिळवली किंवा तुमचा GPA किती आहे, या गोष्टींना मी जितके महत्त्व दिले होते त्यापेक्षा त्या प्रत्यक्षात फार कमी महत्त्वाच्या ठरतात. या गोष्टींमुळे कदाचित एखादा दरवाजा थोडासा उघडला जाईल, पण यामुळे नोकरीची खात्री मिळत नाही.” त्याच्या अनुभवानुसार, इतर अनेक घटक परिणाम करतात “नोकरी मिळवणे हे ९० टक्के नशिब आणि १० टक्के नेटवर्किंग असल्याचे मला जाणवले,” असेही तो म्हणाला.

आजही मनोज हा पुढे कसे जावे यासाठी मानसिकदृष्या आणि व्यावसायिक स्तरावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये सर्वात मोठे आव्हान हे कधीकाळी असलेली आत्मविश्वास परत मिळवणे हे असल्याचे तो सांगतो. “सर्वात खराब भाग म्हणजे अंतर्गत नुकसान, मला वाटते की मी माझ्या आयुष्यातील ४ वर्ष गमावली आहेत,” असे तो म्हणाला.

सध्यातरी तो नोकरीसाठी अर्ज करत आहे आणि पुन्हा नव्याने सुरूवात करण्याचा मार्ग शोधतो आहे. “मला सहानुभूती नको आहे, मला फक्त लोक असं काही झाल्यानंतर पुन्हा कसे उभे राहातात हे समजून घ्यायचे आहे,” असे तो म्हणाला.