IndiGo Mumbai airport Viral Video : कित्येकदा परिस्थिती खूप वाईट असेल, तर अनेक जण गोंधळ करून ती आणखी बिघडवण्याचा प्रयत्न करतात; तर काही जण शांत राहून ‘ही वेळही निघून जाईल’ अशा मन:स्थितीत असतात. तीन ते चार दिवसांपासून Indigo विमान कंपनीत निर्माण झालेल्या गोंधळामुळे सगळीकडेच विमानतळावरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ‘इंडिगो’च्या विमान रद्द करण्याच्या संकटामुळे हजारो प्रवासी दिवसेंदिवस भारतात अडकून राहिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावरील एक आनंददायी प्रसंग आता व्हायरल होत आहे.
हा आनंददायी प्रसंग एका गायकामुळे आला; ज्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचे ‘फ्लाइट डिले कॉन्सर्ट’मध्ये रूपांतर केले. इन्स्टाग्रामचा कन्टेन्ट क्रिएटर व गायक झेन रझा यांनी विमानतळावरचा एक व्हिडीओ शेअर केला, जिथे त्यांनी मुंबई-पाटणा फ्लाइटला उशीर झाल्यानंतर त्यांच्या गिटारच्या साह्याने ‘वो लम्हे’ गाण्याचे अचानक सादरीकरण केले. व्हिडीओमध्ये त्याच्याभोवती प्रवाशांची गर्दी जमलेली दिसते आहे. अनेक लोक त्या प्रसंगाने बदललेल्या सुसह्य स्थितीच्या क्षणांचे ध्वनिचित्रण करण्यात मग्न झाले आहेत. काही जण फ्लाईटची तासन् तास वाट पाहून थकले होते; परंतु विमानतळावरील त्रासलेल्या त्या प्रवाशांना गाण्याची धून ऐकायला मिळताच आनंदाने त्यांचे चेहरे उजळले.
या परिस्थितीत एक तरी समजूतदार व्यक्ती होती (Viral Video)
अनेक प्रवासी लग्न, परीक्षा, वैद्यकीय भेटी आणि व्यावसायिक कार्यक्रमांना जाण्यासाठी निघाले होते. पण, विमाने रद्द झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. पण, अनेकदा प्राप्त परिस्थितीत शांत राहणे आणि इतरांना शांत करणे गरजेचे होऊन बसते. गिटारवर गाणे गायला सुरुवात करताच अनेक जण ते गाणे गुणगुणू लागले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरील तणाव काही तासांसाठी का होईना दूर झाला. मग ते फ्लाईटची वाट बघणे सोडून तो गात असलेले गाणे लक्षपूर्वक ऐकू लागले, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नकळत स्मितरेषा उमटेल.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @zaynrazaofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘फ्लाइट उशिरा होती म्हणून लाइव्ह कॉन्सर्ट शुरू कर दिया’ अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून “सर्वांत सुखदायक क्षण”, “त्या गोंधळात सगळ्यांचा मूड बदलून टाकणारा हा क्षण होता”, “देवाचे आभार, या गोंधळाच्या परिस्थितीत तरी एक तरी समजूतदार व्यक्ती होती. राग येणं आणि स्वतःवरचं नियंत्रण सुटणं पूर्णपणे सामान्य आहे. पण, तुम्ही लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवून खूप छान काम केलं” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.
