कोणत्याही आरोपीकडून गुन्हा कबुल करुन घेण्यासाठी सामान्यपणे पोलीस वेगवेगळ्या कल्पना लढवताना दिसतात. मात्र इंडोनेशियामधील पोलिसांनी एका आरोपीकडून गुन्हा कबुल करुन घेण्यासाठी जी पद्धत वापरलीय त्याबद्दल वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. येथील पोलिसांनी जो प्रकार केला तो एखाद्या गुन्हापेक्षा कमी नाहीय, अशीच टीका जगभरातून या पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कृत्यावर होत आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी पोलीस स्थानकामध्ये गुडघ्यांवर बसल्याचे दिसत आहे. या आरोपीचे हातांमध्ये बेड्या घालण्यात आल्यात. त्याचे हात मागे बांधण्यात आल्याचे दिसत आहे. त्यानंतर या आरोपीने गुन्हा कबुल करुन खरी माहिती द्यावी म्हणून पोलिसांनी चक्क त्याच्या गळ्यात दोन मीटर लांबीचा साप गुंडाळला. पोलिसांनी साप गळ्यात टाकताच हा आरोपी थरथर कापू लागला, आरडाओरड करुन लागला. मात्र पोलिसांवर याचा काहीच परिणाम झाला नाही. या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी हा साप उचलून अनेकदा या आरोपीच्या तोंडाजवळ नेऊन त्याला घाबरवत असल्याचे दिसत आहे.

जवळजवळ दीड मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये एक हिरव्या रंगाचा साप जमीनीवर बसलेल्या व्यक्तीच्या गळ्यात गुंडळाल्याचे दिसत आहे. या व्यक्तीचे हात मागे बांधले असल्याने तो काहीच करु शकत नाहीय. हा साप या व्यक्तीच्या गळ्याभोवती आणि खांद्यावर रांगताना दिसत आहे. ही व्यक्ती एक  संशयित आरोपी आहे. ज्या व्यक्तीने या चोरावर साप टाकला तो व्यक्ती आधी या चोराची चौकशी करताना दिसत आहे. तू किती वेळा मोबाइल चोरले आहेस हे सांग. यावर चोर मी केवळ दोनदा मोबाईल चोरी केल्याची कबुली देतो. मात्र हे उत्तर खरं न वाटल्याने पोलीस अधिकारी या चोराच्या गळ्याजवळ साप सोडतो आणि त्याला खरं बोलं असं सांगत त्याला खरं बोलण्यास सांगतो.

खरं तर हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. मात्र सोशल नेटवर्किंगवरील मेमरीजमुळे आता तो पुन्हा चर्चेत आलाय. पोलिसांनी या चोराला दिलेली वागणूक नियमांना धरुन नसल्याची माहिती स्थानिक पोलीस प्रमुखांनी त्यावेळी दिली होती. पोलीस प्रमुख टोनी स्वादया यांनी एक पत्रक जारी केलं होतं. “आम्ही या प्रकरणातील व्यक्ती विरोधात कठोर कारवाई केली आहे,” असं स्वादया यांनी स्पष्ट केलेलं. मात्र त्याचवेळी त्यांनी हा साप पाळीव सापांपैकी एक होता तसेच तो विषारी नव्हता असं सांगत पोलिसांची बाजूही घेतली होती. मात्र हा साप नक्की कोणत्या प्रजातीचा होता याची माहिती त्यांनी दिली नव्हती. आरोपीने गुन्हा लवकर कबुल करावा म्हणून या पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी केलेला हा प्रकार त्यांनीच शोधून काढलेला. अशा पद्धतीने पोलीस खात्यामध्ये चोराची चौकशी केली जात नाही, असंही पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केलं होतं. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या घटनेची निंदा केलेली. हे प्रकरण चांगलं तापल्यानंतर पोलीस खात्याने यासंदर्भात माफी मागितली होती.