आज सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात, काही भावूक करतात, तर काही थेट आपल्या सुरक्षिततेशी जोडलेले असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधतो आहे. हा व्हिडीओ इंदूरमधील एका महिला ट्रॅफिक पोलिसाचा आहे. त्या रस्त्यावर उभं राहून वाहनचालकांना फक्त नियम सांगत नाहीत, तर गाडी चालवताना आपला जीव कसा सुरक्षित राहील हेही अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगतात.
चायनीज मांजामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन, त्यांनी घेतलेली ही काळजी पाहून अनेक लोक त्यांचं मनापासून कौतुक करीत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील गीता भवन चौकात घेतलेला आहे. सिग्नल लाल असताना वाहतूक थांबलेली असते. त्याच वेळेत एक महिला ट्रॅफिक पोलिस रस्त्यावर उभी राहून दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना चायनीज मांजाच्या धोक्याबद्दलची माहिती समजावून सांगताना दिसते.
हा व्हिडीओ कुठलाही गोंगाट न करता, शांत आणि समजूतदार पद्धतीने दिलेल्या संदेशामुळे लोकांच्या मनाला भिडतो. व्हिडीओमध्ये महिला ट्रॅफिक पोलिस हातात रुमाल घेऊन चालकांना सांगताना दिसते, “गाडी चालवताना गळ्यात रुमाल किंवा स्कार्फ बांधा. हेल्मेट नक्की घाला.”
त्या स्पष्ट करतात की, चायनीज मांजा अतिशय धारदार असतो आणि वेगात गाडी चालवताना तो थेट गळ्यावर आल्यानं गंभीर जखम किंवा मृत्यूही होऊ शकतो.
पाहा व्हिडीओ
रुमाल किंवा स्कार्फ असल्यास त्यानं मांजा इजा करू शकत नाही. ही सूचना अनेक चालक लक्ष देऊन ऐकताना दिसतात. कोणतीही भीती न दाखवता, साध्या शब्दांत दिलेला हा संदेश खूप प्रभावी ठरतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एका युजरनं लिहिलं,“भावना चांगली आहे; पण गळ्यात ओढणी बांधणं कधी कधी धोकादायकही ठरू शकतं.”
दुसऱ्या युजरनं म्हटलं, “मनापासून सॅल्यूट! प्रशासन म्हणजे असंच असावं.” तर एका युजरनं संतप्त प्रतिक्रिया देत लिहिलं, “चायनीज मांजा बॅन असूनही लोक वापरतात, हे देशाच्या जनतेच्या जीवाशी खेळणं आहे.” काही सूचना, काही प्रश्न आणि भरपूर कौतुक अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.
