Harsh Goenka 600 Rs Saving Post: आरपीजी ग्रुपचे चेअरमन व प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी बुधवारी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टवरून हर्ष गोएंकांना नेटिझन्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काहींनी तर त्यांच्यावर टीका करताना महिन्याच्या जमा-खर्चाचा हिशेबच मांडला. त्यानंतर मान अमन सिंग छिना या व्यक्तीने त्याबाबत विचारणा केली असता त्यावरही हर्ष गोएंका यांनी दिलेल्या उत्तरावरून त्यांना ट्रोल केलं जात आहे.

काय आहे हर्ष गोएंकांच्या पोस्टमध्ये?

हर्ष गोएंकांनी वास्तविक या पोस्टमध्ये छोट्या सवयींचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यासाठी केलेल्या आवाहनावरून आता त्यांना ट्रोल केलं जात आहे.

‘दररोज ६०० रुपयांची बचत = वर्षाला २,१९,००० रुपये
दररोज २० पानांचं वाचन = वर्षाला ३० पुस्तकं
दररोज १० हजार पावलं चालणे = वर्षाला ७० मॅरेथॉन..

छोट्या सवयींना कधीही कमी लेखू नका’, असं हर्ष गोएंकांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, त्यांच्या आवाहनापेक्षा त्यांनी मांडलेल्या हिशेबावरच नेटिझन्सचं लक्ष केंद्रीत झालं आहे. काही युजर्सनं त्यावरून हर्ष गोएंका यांना प्रश्न केले आहेत. “९० टक्के भारतीय त्यांचा कर वगळता ६०० रुपये दिवसाला कमावण्यात अपयशी ठरतात. मग बचतीचा प्रश्नच उरत नाही”, असं या युजरनं म्हटलं आहे. तसेच, एका युजरनं हर्ष गोएंकांनाच लक्ष्य केलं आहे. “आर्थिक विषमता सर्वोच्च पातळीवर आहे. भारतातला ७६व्या क्रमांकावरचा श्रीमंत व्यक्ती वारश्याने मिळालेल्या संपत्तीच्या जिवावर इतर भारतीयांना त्यांच्या सरासरी उत्पन्नापेक्षाही जास्त बचत करायला सांगत आहे”, अशी पोस्ट या युजरनं केली.

घरात मुलगी असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून डोळ्यांत येईल पाणी

एका नोकरदार युजरनं तर थेट या पैशांचा आणि बचतीचा हिशेबच मांडला.

‘आम्हाला दिवसाला ६०० रुपये भत्ता द्या = २,१९,००० रुपये वर्षाला

आम्हाला २० पाने दिवसाला वाचण्याएवढी मन:शांती द्या = ३० पुस्तकं वर्षाला

कर्मचाऱ्यांना काम व कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समतोल राखण्यासाठी वेळ मिळू द्या, जेणेकरून ते दिवसाला १० हजार पावलं चालतील = ७० मॅरेथॉन वर्षाला’ अशी पोस्ट या युजरनं केली आहे.

“अर्थात, तुम्हाला चांगलं वेतन मिळत नसेल”

दरम्यान, एका अकाऊंटवरून हर्ष गोएंकांना यासंदर्भात विचारणा करण्यात आल्यानंतर त्यावर गोएंकांनी दिलेल्या उत्तरावरही नाराजी व्यक्त होत आहे. “तुम्हाला कल्पना आहे का की ६०० रुपये दररोज म्हणजे काय? साधारणपणे १८ हजार रुपये प्रति महिना. ही एवढी बचत कुणाला परवडू शकेल? कृपया जागे व्हा”, अशी पोस्ट मान अमन सिंग नावाच्या अकाऊंटवरून करण्यात आली. त्यावर “अर्थात तुम्हाला चांगलं वेतन मिळत नाहीये”, अशी पोस्ट गोएंका यांनी केली.