दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. कंपनीने ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या महिन्याच्या वीज बिलाची माहिती शेअर करण्यास सांगितले आहे. कंपनीच्या या निर्णयाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू असून नेटकऱ्यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यानंतर आता इन्फोसिस कंपनीने या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. हा निर्णय कोणत्याही खर्चात कपात करण्यासाठी घेतलेला नसून हा उपक्रम कंपनीच्या दीर्घकालीन ‘सस्टेनिबिलिटी प्रोग्राम’चा एक भाग आहे. मात्र यानंतरही या निर्णयाबाबत इंटरनेटवर वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

इन्फोसिसचे सीएफओ काय म्हणाले?

इन्फोसिसचे सीएफओ जयेश संघराजका यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत ईमेलनुसार, कंपनीने हे पाऊल एका व्यापक ‘वर्क-फ्रॉम-होम इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन सर्व्हे’चा भाग आहे.

द इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या ईमेलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, घरगुती वीज वापराचा डेटा गोळा करण्याचे मुख्य कारण हे ‘हायब्रीड वर्क’ म्हणजेच काही दिवस ऑफिस आणि काही दिवस घरातून काम केल्याने पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचे अचूक मोजमाप करणे आणि कंपनीचे क्लीन एनर्जी रिपोर्टिंग सुधारणे हे आहे.

इन्फोसिसच्या हायब्रिड पॉलिसीअंतर्गत कर्मचारी महिन्यातील बहुतांश दिवस घरातून काम करतात आणि त्यांना महिन्यातून किमान १० दिवस ऑफिसमध्ये यावे लागते.

संघराजकाच्या मते, घरातून काम करताना वापरलेली वीज कंपनीच्या एकूण कार्बन फूटप्रिंटमध्ये भर घालते, ज्यामुळे कंपनीच्या सस्टेनिबिलिटीच्या मोजमापात याची शाश्वततेच्या गणनेत घरातील वीजेच्या वापराचा समावेश करणे आवश्यक होते.

“घरातून काम करताना वापरलेली वीज देखील इन्फोसिसच्या ग्रीनहाऊस गॅस एमिशन्स फूटप्रिंटमध्ये भर घालते. आपल्या रिपोर्टिंगची अचूकता वाढवण्यासाठी आणि अधिक प्रभावी सस्टेनिबिलिटी उपक्रमासाठी तयार करण्यासाठी वर्क-फ्रॉम-होम दरम्यान होणाऱ्या ऊर्जेचा वापर समजून घेणे महत्त्वाचे आहे,” असे इन्फोसिसचे सीएफओ म्हणाले आहेत.

कर्मचाऱ्यांना कोणती माहिती शेअर करण्यास सांगितली आहे?

कर्मचाऱ्यांना त्यांच्या वीज वापराचा डेटाचे संपूर्ण ब्रेकडाऊन कंपनीला द्यावे लागणारे आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, वीज वापर सर्वेक्षत विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये तुमच्या घरातील विजेची उपकरणांचा वापर, पंखे, एसी , हीटर्सचा आणि लाईट वॅटेज यांपासून ते तुमच्या घरी सौर पॅनेल बसवले आहेत का, इथपर्यंतच्या तपशिल विचारण्यात आला आहे.

संघराजका यांच्या मते, हा संपूर्ण उपक्रम हा ग्लोबल कार्बन फूटप्रिंटमध्ये कपात करण्याच्या इन्फोसिसच्या वचनबद्धतेसाठी राबवला जात आहे. त्यांच्या इमेलमध्ये संघराजका म्हणाले की इन्फोसिसने २००८ त्यांची पर कॅपिटा एनर्जी वापर ५५ टक्के कमी केला आहे आणि गेल्या वर्षी आपल्या वीज वापराच्या एकूण गरजेपैकी सुमारे ७७ टक्के वीज अक्षय ऊर्जा स्रोतांतून मिळवली आहे.

दरम्यान कंपनीकडून आलेल्या या ईमेलमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे पाहिला मिळाले. अनेकांनी कंपनीच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

तर काही वापरकर्त्यांनी कर्मचाऱ्यांवर येणारा आर्थिक ताणाच्या मुद्द्यावरून या उपक्रमाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका वापरकर्त्याने लिहिले की, वर्क फ्रॉम होममुळे कंपन्यांचा ऑफिसचा खर्च वाचतो, पण कर्मचाऱ्यांना विजेचे बिल जास्त येते आणि आता त्यांना तो डेटा देखील शेअर करायला सांगितला जात आहे.