‘इट्स नेव्हर लेट’ अशी म्हण आहे. कुठलंही काम करताना कितीही अडचणी आल्या, पराभवाचे कितीही चटके बसले आयुष्य हातातून निसटलं असं कितीही वाटत असलं तरी सगळं काही सावरत आयुष्यात पुन्हा भरारी घेण्याची धमक असेल तर काहीही अशक्य नाही हेच या इंग्लिश म्हणीतून सांगितलं जातं.

या लेखाच्याय सुरूवातीचा फोटो पहा. या फोटोत डाव्या आणि उजव्या बाजूला असणारा एकच माणूस आहे यावर विश्वास बसणं कठीण आहे. या माणसाचं नाव आहे खलील रफाती.  कधीकाळी अंमली पदार्थांच्या संपूर्णपणे आहारी गेलेल्या खलीलने आपल्या व्यसनाधीनतेवर मात करत आयुष्यात नवी सुरूवात केली. आज तो लाखो डाॅलर्सच्या उद्योगाचा मालक आहे. आणि आपल्या आयुष्याचा कायापालट त्याने वयाच्या ३३ व्या वर्षी घडवून आणला.

लहानपणापासूनच हिंसा आणि चोरीमारीच्या वातावरणात वाढलेला खलील त्याच्या विशीमध्ये ड्रग्जच्या आहारी गेला. ड्रग्जची नशा सिगरेट, दारूपेक्षाही भयानक असते. एकदा ड्रग्ज घेतल्यावर त्याची नशा उतरताना भयानक ‘विड्राॅवल सिंप्टम्स’ येतात. आपलं शरीर त्या ड्रग्जच्या एवढं आहारी गेलेलं असतं की शरीरतल्या त्या ड्रगची मात्रा जराही कमी झाली की शरीर बंड करून उठतं. यावेळी कल्पना करता येणार नाही अशी डोकेदुखी, प्रचंड शारिरीक वेदना, भयंकर उलट्या असी टोकाची लक्षणं जाणवतात. यामुळे ड्रग्जच्या आहारी गेलेला मनुष्य सारखा ड्रग्जच्या  आहारी जातो.

वयाच्या ३३ व्या वर्षी ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने बेशुध्द पडलेल्या खलीलवर डाॅक्टरांचे उपचार सुरू असताना आपल्या अशा आयुष्याची त्याला लाज वाटली. याआधी कितीतरी वेळा त्याने ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्याने तो बेशुध्द पडला होता. यानंतर मात्र त्याने त्याचं आयुष्य बदलायचं ठरवलं. आणि त्यानुसार त्याने पावलं टाकायला सुरूवात केली. त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. स्वत: एका भयानक शारिरीक स्थितीमधून गेल्यानंतर आरोग्याला घातक ठरेल अशा कोणत्याही गोष्टीचा व्यवसाय त्याने करणं टाळलं आणि स्वत:ची फ्रूट ज्यूस बनवणारी कंपनी त्याने स्थापन केली.

वाचा- अनोखी लव्ह स्टोरी, एकाच मुलीशी चारवेळा केला विवाह

‘सनलाईफ आॅरेगॅनिक्स’ या त्याच्या कंपनीचा विस्तार अमेरिकेत ६ ठिकाणी झाला आहे. आणि त्याच्या हाताखाली आज २०० जणं काम करतात.

कधीकाळी ड्रग्जच्या आहारी जात देशोधडीला लागू पाहणारा खलील रफाती आज लाखोंची उलाढाल करतोय. या सगळ्यामध्ये त्याला एकाच गोष्टीची साथ दिला ती म्हणजे त्याचा दुर्दम्य आशावाद आणि जिद्द. ‘इट्स नेव्हर लेट’ या उक्तीचं चालतंबोलतं उदाहरण असणारा खलील रफाती आज ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या कितीतरी तरूणांचा रोल माॅडेल झाला आहे.