iPhone 17 Price Hike in India After iPhone 18 Pro Launch: iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच झाल्यानंतर जुन्या iPhone मॉडेल्सच्या किमती कमी होतील, अशी अनेक ग्राहकांची अपेक्षा होती. मात्र, यंदा Appleने भारतातील ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. नवीन मॉडेल आल्यानंतर iPhone 17 स्वस्त होण्याऐवजी त्याची किंमत थेट 17,000 रूपयांनी वाढली आहे. त्यामुळे iPhone 17ची सुरुवातीची किंमत आता तब्बल 99,900 रूपये एवढी झाली आहे असे वृत्त फर्स्टपोस्ट या वेबसाईटने दिले आहे.

iPhone 18 Pro आल्यानंतर जुन्या iPhoneची किंमत कमी का झाली नाही?

साधारणपणे Apple नवीन पिढीचे iPhone लाँच केल्यानंतर मागील पिढीतील काही मॉडेल्स कमी किमतीत विक्रीसाठी ठेवते. त्यामुळे नवीन iPhone घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना जुन्या मॉडेलवर चांगली डील मिळण्याची शक्यता असते. मात्र यंदाचे चित्र वेगळे आहे. iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxच्या लाँचनंतर iPhone 17ची किंमत कमी होण्याऐवजी वाढली आहे.

दरम्यान, Appleने iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ही दोन्ही मॉडेल्स आपल्या अधिकृत लाइनअपमधून हटवली आहेत. मात्र, थर्ड पार्टी विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेला जुना स्टॉक संपेपर्यंत ही मॉडेल्स विक्रीसाठी मिळू शकतात.

iPhone 17ची नवी किंमत किती?

Appleने iPhone 17 च्या दोन्ही स्टोरेज व्हेरिएंटच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.

  • iPhone 17 256GB – 99,900 रूपये
  • iPhone 17 512GB – 1,24,900 रूपये

256GB मॉडेलच्या किमतीत तब्बल ₹17,000 ची वाढ झाली आहे. तर 512GB व्हेरिएंट 22,000 रूपयांनी महागला आहे. विशेष म्हणजे 256GB मॉडेलची किंमत आता 1 लाखांपेक्षा अवघी १०० रूपयांनी कमी आहे. iPhone 17 पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. Mist Blue, Sage, Lavender, Black आणि White.

फक्त iPhone 17 नाही, ही मॉडेल्सही महागली

Appleने भारतात केवळ iPhone 17 ची किंमत वाढवलेली नाही. कंपनीने इतर काही जुन्या मॉडेल्सच्या किमतीतही मोठी वाढ केली आहे.

  • iPhone 17e: ₹64,900 वरून 79,900 रूपये
  • iPhone 16: आता 89,900 रूपये
  • iPhone Air: 1,19,900 रूपयांवरून थेट 1,49,900 रूपये

यामध्ये iPhone Airच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे तब्बल ₹30,000 ची वाढ झाली आहे. iPhone 17e देखील ₹15,000ने महागला आहे.

iPhone महागण्यामागे नेमकं कारण काय?

Appleने iPhoneच्या किमतीत वाढ करण्यामागे कोणतेही ठोस कारण अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. मात्र, स्मार्टफोन उद्योगात सध्या मेमरी कॉम्पोनंट्सच्या वाढत्या किमतींची चर्चा सुरू आहे.

AI तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत असल्याने डेटा सेंटर आणि AI प्रणालींसाठी मोठ्या प्रमाणात उच्च-कार्यक्षमतेची मेमरी आवश्यक आहे. त्यामुळे मेमरीची मागणी वाढली असून पुरवठ्यावरही दबाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादन खर्चावर होत असल्याचे मानले जाते. मात्र, iPhone 17 च्या किमतीतील वाढीमध्ये मेमरीच्या वाढलेल्या किमतींचा नेमका किती वाटा आहे, हे Appleने स्पष्ट केलेले नाही. याआधीही Appleने भारतात काही Mac आणि iPad मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे iPhoneच्या किमतीतील ही वाढ पूर्णपणे अनपेक्षित नसल्याचेही मानले जात आहे.

ग्राहकांना मोठा धक्का

iPhone 18 Proच्या लाँचची वाट पाहून iPhone 17 स्वस्तात घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी यंदाची परिस्थिती उलटी ठरली आहे. ज्या iPhoneची किंमत कमी होण्याची अपेक्षा होती, तोच आता जवळपास ₹1 लाखांवर पोहोचला आहे. त्यामुळे जुना iPhone घेऊन पैसे वाचवण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना यंदा नेहमीसारखी मोठी किंमतकपात मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.