मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर एका धावेने मात करून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. रोहित शर्माचं कर्णधार म्हणून हे चौथं विजेतेपद ठरलं. त्यामुळे विजयाचं सेलिब्रेशनसुद्धा दणक्यात झालं. सामना संपल्यानंतर हिटमॅन रोहितनं रॅप साँग म्हटलं तर युवराज सिंगने डान्स करत त्याला साथ दिली. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडिओत रोहित शर्मा ‘गली बॉय’ चित्रपटातील रॅप साँग गाताना तर युवराज त्यावर ठेका धरताना दिसतोय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही रोहितवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आयपीएलचे जेतेपद पटकावल्यावर रोहित शर्माचा आनंद गगनात मावेनासा होता. सामना संपल्यावर रोहित आपल्या लाडक्या लेकीकडे गेला आणि तिच्यासोबत विजयाचा आनंद साजरा केला.

यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने २०१३, २०१५, २०१७ मध्ये आयपीएल चषक आपल्या नावे केलं होतं. त्यानंतर आता २०१९ मध्येही मुंबईने बाजी मारली आहे.