IRCTC New Website : रेल्वे प्रवाशांसाठी १५ जुलै २०२६ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे, कारण आज अखेर रेल्वेने IRCTC ची नवीन वेबसाईट लाँच केली आहे. या नवीन पोर्टलवर प्रवाशांना नेमक्या कोणत्या प्रगत सुविधा मिळणार आहेत, तसेच रेल्वे प्रवाशांना कोणते बदल दिसणार आहेत, याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ….
गेल्या जून महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे राजस्थानमधील जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (MNIT) विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. यावेळी एका विद्यार्थिनीने थेट रेल्वेमंत्र्यांकडे ऑनलाइन तिकीट बुक करताना IRCTC ची वेबसाईट वारंवार ‘हँग’ होत असल्याची तक्रार केली होती.
यावर उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले होते की, रेल्वे १५ जुलै २०२६ रोजी IRCTC ची नवीन वेबसाईट लाँच करेल. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज म्हणजेच १५ जुलै रोजी भारतीय रेल्वेचे हे बहुप्रतीक्षित नवीन पोर्टल लाँच झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया या नवीन वेबसाईटवर प्रवाशांना तिकीट बुकिंग अधिक सोपे करण्यासाठी काय-काय नवीन सुविधा मिळणार आहेत.

IRCTC च्या नवीन वेबसाईटमध्ये कोणते ५ बदल दिसणार आहेत?
१. पहिला बदल (कॅप्चा कोडपासून सुटका)
आतापर्यंत तिकीट बुक करताना प्रवाशांना जो ‘कॅप्चा कोड’ (Captcha Code) भरावा लागत असे, तो या नवीन इंटरफेसमध्ये भरावा लागणार नाही.
कॅप्चाच्या ऐवजी नवीन Advanced Security Features जोडली आहेत, यामुळे प्रवाशांची कॅप्चा भरण्याच्या त्रासातून सुटका होईल.
२. दुसरा बदल (स्लो इंटरनेटवरही वेगाने चालणार)
नवीन वेबसाईट कमी इंटरनेट स्पीडवरही अत्यंत वेगाने काम करेल.
यासह वेबसाईटचा इंटरफेस अतिशय सोपा, सुटसुटीत (Clean) आणि हलका (Lightweight) ठेवण्यात आला आहे.
३. तिसरा बदल (पेमेंट पर्याय अधिक सोपे)
तिकिटाचे पैसे भरण्याची (Payment) प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान करण्यात आली आहे.
नवीन वेबसाईटवर प्रवाशांना ‘IRCTC-iPay’ आणि ‘UPI’ पेमेंटचे पर्याय थेट होम स्क्रीनवरच समोर दिसतील.
तसेच, ट्रान्झॅक्शन फेल (Payment Fail) होण्याची शक्यता नसेल.
४. चौथा बदल (एकाच स्क्रीनवर सर्व माहिती आणि ‘नो क्रॅश’ सिस्टीम):
तिकीट बुकिंग गर्दीच्या वेळी (Peak Hours) वेबसाईट क्रॅश होऊ नये, यासाठी विशेष तांत्रिक व्यवस्था करण्यात आली आहे.
नवीन इंटरफेसमध्ये प्रवाशांना एकाच स्क्रीनवर ट्रेनची लिस्ट, सीटची उपलब्धता (Seat Availability) आणि तिकीट भाडे स्पष्टपणे दिसेल.
५. पाचवा बदल (तत्काळ तिकीट बुकिंग अधिक सुलभ)
तत्काळ (Tatkal) तिकीट बुक करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
नवीन वेबसाईटचे सर्व्हर अधिक अद्ययावत आणि वेगवान करण्यात आले आहेत, जेणेकरून सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुमचे तत्काळ तिकीट मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
