भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चांद्रयान मोहिमेला यश आलं आहे. बुधवारी चांद्रयान-३ ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. इस्रोच्या या यशानंतर संपूर्ण जगभरातील लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताने दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवून इतिहास रचला आहे. आतापर्यंत अशी कामगिरी कोणत्याच देशाला करता आली नाही. रशिया, अमेरिका आणि चीननंतर चंद्रावर यान पाठवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे.
चंद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर पाकिस्तानातील लोकही भारताचं कौतुक करत आहेत. पाकिस्तानचे भारताशी कितीही वैर असलं, तरी या यशानंतर पाकिस्तानी लोक भारताचे अभिनंदन करत आहेत. दरम्यान, चांद्रयान-३ मोहिमेवरून एका पाकिस्तानी तरुणाने आपल्याच देशाची खिल्ली उडवली आहे. चंद्रावरील स्थितीप्रमाणे पाकिस्तानची अवस्था झाली आहे, अशी उपरोधिक टीका पाकिस्तानी तरुणाने केली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.




भारत पैसे खर्च करून चंद्रावर जात आहे. पण आम्ही आधीपासूनच चंद्रावर राहत आहोत. कारण चंद्रावर पाणी नाही, इथेही (पाकिस्तानात) पाणी नाही. चंद्रावर गॅस नाही, पाकिस्तानातही गॅस नाही. चंद्रावर वीज नाही, इथेही वीज नाही. त्यामुळे आम्ही आधीपासूनच चंद्रावर राहत आहोत, अशी उपरोधिक टोलेबाजी संबंधित तरुणाने केली आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चांद्रयान मोहिमेच्या यशामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा हा जगातील चौथा देश ठरला आहे. यापूर्वी रशिया, चीन आणि अमेरिकेने ही कामगिरी केली आहे. भारताच्या या अभूतपूर्व यशानंतर संपूर्ण जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.