किकी चॅलेंज पूर्ण करण्यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातबाजी करून तरुणांमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र याच जाहिरातबाजीमुळे कोचीमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय जवाहर सुभाष चंद्रा या तरुणाला मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जवाहरचे फोटो वापरून जयपूर पोलिसांनी किकी चॅलेंज न करण्याचं आवाहन केलं आहे. खरं तर जाहिरातीत फोटो वापरण्यात त्याचा काही आक्षेप नव्हता या जाहिरातीत जवाहरला मृत दाखवण्यात आलं आहे. त्याच्या फोटोला पुष्पहार घालण्यात आला आहे. तसेच किकी चॅलेंज करताना त्याचा मृत्यू झाला असंही त्यावर लिहिण्यात आलं आहे. ही जाहिरात व्हायरल झाली अन् जवाहरचा मित्रपरिवार चिंचेत पडला.

Kiki Challenge : सेलिब्रिटींपेक्षा या शेतकऱ्यांच्या किकी चॅलेंजची सर्वाधिक चर्चा

जवाहराचा खरंच मृत्यू झाला असं वाटून अनेकांनी त्याच्या घरी फोन केले. खुद्द जवाहरच्या मोबाईल क्रमांकांवरही त्याची चौकशी करण्यासाठी फोन येऊ लागले. यामुळे जवाहर अक्षरश: त्रस्त झाला. ‘या सर्व प्रकरणामुळे मनस्ताप तर झाला मात्र आपण मेले नसून जिवंत आहोत हे इतरांना सांगणं दिवसेंदिवस अवघड होत आहे’ असंही तो म्हणला.

आश्चर्य म्हणजे जवाहरनं किकी चॅलेंज केलंही नाही मात्र या चॅलेंजचा तो बळी ठरला अशी जाहिरातबाजी करण्यात आली आहे. खरं तर चांगल्या कारण्यासाठी आपला फोटो वापरण्यात आला, ही आनंदाची गोष्ट आहे पण, यामुळे मित्रपरिवारात अनेक गैरसमज पसरले आहेत त्यामुळे आपण जिवंत आहोत हे पटवून देताना माझ्यासह कुटुंबियांनाही आता मात्र अधिक मनस्ताप होऊ लागला आहे असंही जवाहर म्हणाला.