Bear Attacks On Car Shocking Video : विचार करा, रात्रीची वेळ आहे, तुम्ही एखाद्या निर्जन रस्त्यावरून गाडी चालवत आहात आणि अचानक समोर अस्वल आले. तेही एकटे नाही, तर आपल्या पिल्लासह! जपानमधील होक्काइडो येथे एका चालकासमोर अगदी असाच थरारक प्रकार घडला. या घटनेनंतर जे काही घडले त्याने सर्वांचा थरकाप उडाला आहे.

ही घटना २९ सप्टेंबरच्या रात्री होक्काइडो येथील बिफुका भागात घडली. यूपीआय (UPI) च्या वृत्तानुसार, स्थानिक पोलिसांनी या घटनेचा डॅशकॅम व्हिडीओ जाहीर केला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला दोन अस्वल दिसत आहेत. त्यापैकी एक मादी अस्वल आणि दुसरे तिचे पिल्लू असल्याचा अंदाज आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला सर्व काही शांत वाटते. अस्वल आणि तिचे पिल्लू कारपासून दूर जात होते, यावेळी चालकही समजूतदारपणा दाखवत गाडी हळूच थांबवतो. परंतु, तेवढ्यात मोठे अस्वल अचानक मागे फिरते आणि थेट कारच्या दिशेने धावत येते.

रस्त्यावर दिसले अस्वलाचे भयानक रूप

यानंतरचे दृश्य अत्यंत भीतीदायक होते. संतापलेली मादी अस्वल उडी मारून थेट कारच्या बोनटवर चढली आणि आपल्या पंज्यांनी व दातांनी कारच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच तिचे मन शांत झाले नाही; तिने मागे हटून कारच्या पुढच्या भागावर जोरदार धडका दिल्या. काही वेळ हा भीतीदायक प्रकार सुरू होता, त्यानंतर ती आपल्या पिल्लाला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेली.

रिपोर्टनुसार, या हल्ल्यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. बोनेटवर अनेक ओरखडे व डेंट पडले, तर एका ठिकाणी कारचा पत्रा तुटला आहे. सुदैवाने कारमध्ये बसलेल्या चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही, तो पूर्णपणे सुरक्षित आहे, तसेच या घटनेत अस्वलालाही कोणतीही दुखापत झाली नसल्याचे स्थानिक बातम्यांमध्ये म्हटले आहे.

हे क्षेत्र तपकिरी अस्वलांचे (Brown Bears) नैसर्गिक निवासस्थान असल्याने, या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. निसर्गाच्या नियमानुसार जंगली प्राणी, विशेषतः मादी अस्वले, आपल्या पिल्लांच्या सुरक्षेबाबत अत्यंत आक्रमक असतात. समोरच्या वाहनामुळे पिल्लाला धोका आहे असा समज झाल्याने तिने हा हल्ला केला असावा.

त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या जंगल किंवा वन्य भागातून जात असाल आणि रस्त्यावर प्राणी दिसला तर गाडी थांबवा, शांत राहा आणि अत्यंत सावधगिरी बाळगा.