Jio Independence Day Offer Announced : ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, तर अगदी टेलिकॉम कंपन्यासुद्धा सणांनिमित्त सेल सुरू करीत असतात. तर या प्रत्येक सेलमध्ये ग्राहकांना खास सूट किंवा ऑफर देण्यात येते. तर आता रिलायन्स जिओने स्वातंत्र्य दिनानिमित्त एक विशेष ऑफर सादर केली आहे, ज्यामुळे त्यांच्या दीर्घकालीन ब्रॉडबँड प्लॅनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. या सणासुदीच्या ऑफरचा भाग म्हणून कंपनी त्यांच्या १०० Mbps ब्रॉडबँड प्लॅनवर ६,००० रुपयांची सूट देत आहे.

ही ऑफर ‘MyJio’ ॲपवर दिसून आली आहे. मात्र, जिओच्या अधिकृत वेबसाईटवर ती अद्याप उपलब्ध झालेली नाही. ‘इंडिया टुडे टेक’च्या निदर्शनास आले आहे की, ही ऑफर सध्या कोणत्याही विशिष्ट अटींशिवाय उपलब्ध आहे म्हणजेच ऑफर सर्व जिओ ग्राहकांसाठी असून, टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल आणि काही युजर्सना ती कदाचित उशिरा दिसून येईल.

१०० Mbps ब्रॉडबँड प्लॅन झाला स्वस्त

स्वातंत्र्यदिनाच्या ऑफर अंतर्गत किंवा ‘फ्रीडम डे पॅक’मध्ये तुम्हाला १५ महिन्यांचा ब्रॉडबँड प्लॅन आता नेहमीच्या १६ हजार रुपयांऐवजी फक्त १० हजार रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच ग्राहकांना थेट सहा हजार रुपयांची बचत होणार आहे. या ऑफरनुसार महिन्याचा खर्च सुमारे ६६६ रुपये येईल. नेहमी हा प्लॅन प्रभावीपणे सुमारे १,०६६ रुपये प्रतिमहिना पडत असल्याने ही ऑफर ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

या प्लॅनमध्ये १०० Mbps इंटरनेट स्पीड, अनलिमिटेड डेटा, १,००० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स, १२ हून अधिक एंटरटेन्मेंट ॲप्सचा ॲक्सेस मिळणार आहे. ‘MyJio’ ॲपवरील माहितीनुसार, या पॅकेजमध्ये JioHotstar, SonyLiv आणि Zee5 च्या सबस्क्रिप्शनचाही समावेश असणार आहे. रिलायन्स जिओने यापूर्वीही स्वातंत्र्यदिनाच्या काळात ब्रॉडबँडवर अशाच प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. त्यामुळे या वर्षीची ऑफर त्यांच्या वार्षिक प्रमोशनल धोरणाशी सुसंगत आहे.

‘जिओ होम’ प्लॅन्स

जिओने नुकतीच ‘होम पॅक्स’ची एक नवीन सीरिज सादर केली होती, ज्यामध्ये वायफाय, टेलिव्हिजन, ओटीटी (OTT) सबस्क्रिप्शनचा समावेश एकाच प्लॅनमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच ही स्वातंत्र्यदिन ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

या नवीन प्लॅनची सुरुवात दरमहा ४०० रुपयांपासून होते. त्यामध्ये केवळ टीव्हीसाठीचा (TV-only) पर्याय उपलब्ध आहे, ज्यामध्ये १,००० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स, १२ हून अधिक ओटीटी ॲप्स, टीव्हीवर यूट्यूब, लाइव्ह टीव्ही ‘प्ले/पॉज’ (Play/Pause) करण्याची सुविधा समाविष्ट आहे. त्या युजर्सना केवळ इंटरनेट सेवेची गरज आहे, त्यांच्यासाठी जिओ ४५० रुपये (प्रभावी मासिक किंमत) दरात ३० Mbps चा ब्रॉडबँड प्लॅन आणि ६०० रुपये प्रति महिना दरात १०० Mbps चा पर्याय उपलब्ध करून देत आहे.

Google Trends

ज्या ग्राहकांना एकत्रित सेवा (बंडल्ड सर्व्हिसेस) हव्या आहेत, ते ‘वाय-फाय + टीव्ही + ओटीटी’ (Wi-Fi + TV + OTT) प्लॅन्सची निवड करू शकतात. ३० Mbps च्या बंडल प्लॅनची ​​किंमत ५५५ रुपये प्रति महिना, तर १०० Mbps च्या प्लॅनची ​​किंमत ७०७ रुपये प्रति महिना आहे. या दोन्ही प्लॅन्समध्ये अमर्यादित ब्रॉडबँड, १,००० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस, डझनभर ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. तसेच, पात्र नवीन ग्राहकांसाठी जिओ मोफत ‘डोअरस्टेप इन्स्टॉलेशन’ (घरी येऊन सेवा बसवून देणे) आणि देखभालीची सुविधाही देत ​​आहे, ज्यामुळे युजर्सना जिओच्या होम ब्रॉडबँड सेवेकडे वळणे अधिक सोपे होणार आहे.