दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणी केवळ सामान्य व्यक्ती नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही आपले मत व्यक्त करत आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या घटनेबाबत ट्विटरद्वारे भाष्य केले होते. ते ट्विट बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या चांगलंच पसंतीस पडलं असून तिने आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं आहे. सोनम कपूरने आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर दिलेली प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध नोंदवताना आदित्य ठाकरेंनी “निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला चिंताजनक आहे. जामिया असो किंवा जेएनयू…विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर केला जाऊ नये… त्या गुंडांवर तातडीने कारवाई व्हायला पाहिजे” अशा आशयाचं ट्विट केलं होतं. आदित्य ठाकरेंच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सोनम कपूरने “आपल्याला अशाच नेत्यांची गरज आहे…अद्यापही अपेक्षा कायम आहेत” असं ट्विट केलंय. सोनमचं हे ट्विट चांगलंच व्हायरल होत असून अनेक नेटकरी तिच्या ट्विटवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा – जेएनयूमधील हिंसाचार पाहून २६/११ मुंबई हल्ल्याची आठवण झाली – उद्धव ठाकरे

जवाहर लाल नेहरू विद्यालय (जेएनयू) परिसरात रविवारी ( दि. 5 जानेवारी) सायंकाळी काही अज्ञात लोकांनी घूसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या. तर, अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झालेत. ‘अभाविप’कडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर अभाविपने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्यानंतर 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.