Tamil Nadu Chief Minister Vijay’s Heartwarming Video Goes Viral: तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. राजकारणातील मोठ्या व्यक्ती अनेकदा सुरक्षेच्या गराड्यात वावरताना दिसतात. मात्र, मुख्यमंत्री विजय यांनी एका प्रवासादरम्यान अचानक आपला ताफा थांबवला आणि शेतात काम करणाऱ्या काही वृद्ध महिलांची भेट घेतली. यावेळी घडलेला एक छोटासा प्रसंग मात्र उपस्थितांच्या आणि नेटकऱ्यांच्या मनाला चांगलाच भिडला.
मुख्यमंत्री विजय मंगळवारी सालेम येथे गेले होते. कावेरी खोऱ्यातील सांबा भाताच्या लागवडीसाठी मेट्टूर धरणातून पाणी सोडण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांचा सालेम दौरा होता. मेट्टूर जलविद्युत केंद्राची पाहणी केल्यानंतर ते सालेम विमानतळाकडे निघाले होते.
याच प्रवासादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात त्यांना काही वृद्ध महिला काम करताना दिसल्या. त्या महिलांना पाहताच विजय यांनी अचानक आपला गाड्यांचा ताफा थांबवला. सुरक्षा व्यवस्था आणि वाहनांचा ताफा पाहून परिसरातही नागरिकांची गर्दी होऊ लागली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी थेट त्या महिलांजवळ जाऊन, त्यांच्याशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी आजींजवळ जाऊन हाती घेतला हात
मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबल्याचे पाहून चेल्लम नावाच्या एका वृद्ध महिलेलाही नेमकं काय सुरू आहे हे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. गर्दीतून पुढे जाताच तिची नजर मुख्यमंत्री विजय यांच्यावर पडली. कोणताही संकोच न करता, ती त्यांच्याजवळ गेली आणि त्यांचा हात हातात घेतला.
या भेटीतील सर्वांत भावनिक क्षण याच वेळी घडला. विजय यांनी चेल्लम यांना जेवण झालं का, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी अद्याप जेवण केले नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा असल्याने आपण वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर विजय यांनी त्यांचा हात धरून परिसरात फेरफटका मारला. त्यांनी त्यांचे नाव विचारले आणि प्रकृतीचीही विचारपूस केली. त्यानंतर स्थानिक शेतकरी पलानीसामी यांच्या घराचा परिसर आणि गोठाही त्यांनी पाहिला.
अचानक काढला स्वतःचा चष्मा!
या साध्याशा भेटीत पुढे असा प्रसंग घडला, ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
मुख्यमंत्री विजय यांनी स्वतःचा चष्मा काढला आणि तो चेल्लम यांना देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला चेल्लम यांनी तो घेण्यास थोडा संकोच केला. मात्र, विजय यांनी प्रेमाने त्यांचा संकोच दूर केला आणि स्वतःच्या हाताने तो चष्मा त्यांच्या डोळ्यांवर घातला.
चित्रपटातील नायकाचा हा अंदाज आता प्रत्यक्ष आयुष्यात पाहायला मिळाल्याने चेल्लम यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विजय यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला असून, त्यांचा हा साधा आणि अनपेक्षित अंदाज पाहून उपस्थितही भारावून गेले.
आजी म्हणाल्या, “चित्रपटात दिसतात तसेच दिसत होते”
मुख्यमंत्री विजय यांनी स्वत:चा चष्मा त्यांना घातल्यानंतर चेल्लम यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी भाव स्पष्टपणे दिसत होते. त्या भेटीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, विजय चित्रपटांमध्ये जसे दिसतात, तसेच त्यांना प्रत्यक्षातही दिसत होते. या भेटीमुळे आपण खूप आनंदी झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांबद्दल असलेला आपला जिव्हाळाही त्यांनी व्यक्त केला. कोणी त्यांना इजा करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे रक्षण करण्यासाठी आपण पुढे येऊ, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
१५ मिनिटांच्या भेटीत आणखी काय घडलं?
मुख्यमंत्री विजय यांनी या ठिकाणी जवळपास १५ मिनिटे व्यतीत केली. त्यादरम्यान त्यांनी स्थानिक शेतकरी कुटुंबांची आस्थेने भेट घेतली आणि त्यामधील कुटुंबीयांना पारंपरिक भेटवस्तू म्हणून धोतर आणि साड्या दिल्या.
त्याशिवाय स्थानिक शेतीच्या प्रश्नांवरही त्यांनी चर्चा केली. सरकारने दूध खरेदीच्या दरात वाढ करून, तो ४४ रुपये करण्याबाबतच्या निर्णयाबाबतही यावेळी चर्चा झाली.
मात्र, या संपूर्ण भेटीत चेल्लम यांच्यासाठी सर्वांत मोठा क्षण ठरला तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चष्मा त्यांच्या डोळ्यांवर घालून दिल्याचा.
आपल्या अडचणी सांगायच्याच राहून गेल्या…
विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या अचानक भेटीत चेल्लम इतक्या भावूक झाल्या होत्या की, त्यांच्या रोजच्या आयुष्यातील अनेक अडचणी सांगायच्या राहून गेल्या.
त्यांचे रेशन कार्ड हरवले आहे. वय झाल्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणे जड शारीरिक काम करणे शक्य होत नाही. अन्नासाठी त्या अल्प मासिक आर्थिक मदतीवर अवलंबून आहेत. मात्र, मुख्यमंत्री समोर उभे असल्याचा आनंद आणि त्यांच्याशी झालेल्या संवाद यांमुळे या समस्या सांगण्याचेही भान त्यांना राहिले नाही.
जाताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा केली जेवणाची आठवण
मुख्यमंत्री विजय यांचा ताफा निघून गेल्यानंतरही चेल्लम यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम होता. मुख्यमंत्र्यांनी स्वतः जेवण केले असल्याचे सांगत त्यांनाही जेवण करून घेण्याचा आग्रह केला होता, असे त्यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
या संपूर्ण भेटीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. मुख्यमंत्री आणि एका वृद्ध महिलेतील हा अनपेक्षित संवाद नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मोठ्या राजकीय कार्यक्रमाच्या गडबडीतही एका आजीचा हात हातात घेऊन, तिची आस्थेने विचारपूस करणारे विजय आणि त्यानंतर स्वतःचा चष्मा त्यांच्या डोळ्यांवर घालून देतानाचा क्षण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
एकीकडे आजींच्या आयुष्यातील रोजच्या संघर्षाची कहाणी आहे, तर दुसरीकडे काही मिनिटांच्या या भेटीने त्यांच्या चेहऱ्यावर अवतरलेला आनंद आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री विजय यांचा हा हृदयस्पर्शी क्षण सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
