Junagadh Pothole Accident Video : पावसाळ्यात रस्त्यावरून वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. यात गेल्या काही दिवसांच्या घटना पाहता रस्त्यावरून चालतानाही नागरिकांनी सतर्क असणं गरजेचे आहे, कारण माणसाला मृत्यू कधी, कुठे, कशामुळे येईल काही सांगता येत नाही. यात पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीव जाणं हे नेहमीचंच झालं आहे. सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून पावसाळ्यात गाडी चालवताना किती काळजी घ्यावी लागते हे समजेल.
स्कूटी रस्त्यावरील खड्ड्यात अडकली अन्…
धक्कादायक अपघाताचा हा व्हिडीओ गुजरातच्या जुनागढमधील आहे. ज्यात पाहू शकता की, एक दाम्पत्य पावसाच्या पाण्याने भरलेल्या रस्त्यातून स्कूटीने वाट काढून जात होते, यावेळी भरधाव स्कूटी रस्त्यावरील खड्ड्यात अडकली आणि दाम्पत्य जोरात खाली कोसळले. खड्ड्यात कोसळल्याने एकाला डोक्याला गंभीर दुखापत झाली, यावेळी स्थानिक त्यांच्या मदतीसाठी धावून आले.
महापालिकेचा निष्काळजीपणा, बाईकस्वार थेट खड्ड्यात
गुजरातमधील जुनागढ येथे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याचे सांगितले जात आहे. शहरातील आझाद चौक परिसरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून नोकरीनिमित्त जाणारे एक दाम्पत्य अपघातग्रस्त झाले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा खड्डा अंदाजे चार फूट रुंद आणि तीन फूट खोल आहे. रहिवाशांच्या मते, गेल्या काही वर्षांपासून न्यू यार्ड-लालपुरा परिसरात रस्ते खचणे आणि खड्डे पडणे ही एक वारंवार घडणारी समस्या बनली आहे, त्यामुळे स्थानिकांसह वाहनचालकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
