Kandivali Crane Collapse Video: संकट कधी कोणावर कोसळेल काही सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीच कुर्ला येथे क्रेन कोसळल्याची घटना घडली; त्याची पुनरावृत्ती बुधवारी कांदिवली येथे घडली.
मुंबईतील कांदिवली पश्चिमेच्या साईनगर परिसरात बांधकाम सुरू असताना अचानक क्रेन कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. शिवशक्तीनगर सोसायटी एसआरए इमारतीच्या शेजारील बिल्डिंगच्या बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. क्रेन कोसळतानाचे आणि त्यानंतरचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक क्रेनचा तोल जाऊन क्रेन कोसळली. क्रेन कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने नागरिक घाबरले आणि परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.
दरम्यान, क्रेन कोसळल्यामुळे ४ ते ५ दुचाकींचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ ४० फूटच्या क्रेनचा तुकडा एका बाजूला पडला आणि २० फूटच्या क्रेनचा तुकडा दुसऱ्या बाजूला पडला.
मात्र, रहिवासी भागात रात्रीच्या वेळी अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने बांधकामाचे काम सुरू असताना अशी घटना घडणे हा सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न मानला जात आहे. क्रेन कोसळली त्यावेळी आजूबाजूला नागरिकांची वर्दळ असती किंवा तिचा फटका जवळच्या इमारतींना बसला असता, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
व्हायरल व्हिडीओ (Kandivali Sainagar Crane Collapse Video)
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच विकासकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या घटनेनंतर बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, क्रेनची स्थिती आणि क्षमता तपासण्यात आली होती का, तसेच रात्रीच्या वेळी काम करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांकडून संबंधित विकासक आणि बांधकाम व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून नेमकी चूक कुठे झाली, याचा तपास करणे गरजेचे आहे.
सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली, तरी या दुर्घटनेने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बांधकामस्थळी सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
