Car Falls 25 Feet from Residential Building Parking: मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. एका निवासी इमारतीच्या पार्किंगमधून कार अचानक सुमारे २५ फूट खाली कोसळल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अवघ्या काही सेकंदांत घडलेला हा प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. सुदैवाने या भीषण अपघातात चालकाचा जीव वाचला, मात्र तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही चित्रफितीत कार पार्किंग परिसरात वळण घेताना दिसते. मात्र, पुढच्याच क्षणी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यासारखे दिसते आणि कार पार्किंगच्या कठड्याला धडक देत थेट खाली कोसळते. काही क्षणांतच कारचा चक्काचूर होतो. हा संपूर्ण प्रकार इतक्या वेगाने घडतो की, पाहणाऱ्यांनाही धक्का बसतो.

काही सेकंदांत घडला थरार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. कार पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये होती. वळण घेत असताना ती अचानक पुढे गेली आणि पार्किंगच्या कडेला असलेला संरक्षक भाग तोडून थेट खाली पडली.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील रहिवासी तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी कारमधील चालकाला बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. चालकाला दुखापत झाली असली तरी त्याचा जीव वाचल्याने मोठी दुर्घटना टळली.

सुदैवाने खाली कोणीच नव्हते

कार ज्या ठिकाणी कोसळली, त्या ठिकाणी त्या वेळी कोणतीही व्यक्ती उभी नव्हती, त्यामुळे आणखी मोठी जीवितहानी टळली अन्यथा हा अपघात अधिक भीषण ठरला असता, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

कार पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली असून ती बाहेर काढण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले.

अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही

कार पार्किंगमधून थेट खाली कशी कोसळली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला होता की पार्किंगमधील सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

या घटनेनंतर बहुमजली इमारतींमधील पार्किंगच्या सुरक्षेविषयीही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यापूर्वीही घडली होती अशीच घटना

दरम्यान, यापूर्वी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती. तेथे एका कारचा चालक पर्यटनासाठी गेला असताना वाहनावरील ताबा सुटला आणि कार सुमारे ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली होती.

मोहित स्वरूप भटनागर (वय ५९), असे त्या चालकाचे नाव असून ते मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील रहिवासी आहेत. माहितीप्रमाणे, ते ‘मिसिंग लिंक’ पुलाचे दृश्य पाहण्यासाठी मातीच्या रस्त्यावर गेले होते. घसरड्या रस्त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन दरीत कोसळले.

मात्र, सुदैवाने कार एका झाडात अडकली, त्यामुळे ती आणखी खोल दरीत कोसळली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. या अपघातातही चालकाला गंभीर दुखापत झाली नाही.

व्हायरल VIDEO पाहून नेटकरीही हादरले

कांदिवलीतील कार अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अवघ्या काही सेकंदांत घडलेल्या या अपघाताने अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी पार्किंगमध्ये अधिक मजबूत संरक्षक भिंती आणि सुरक्षा उपायांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

हा व्हिडीओ केवळ अपघाताचा नाही, तर वाहन चालवताना आणि बहुमजली पार्किंगमध्ये वाहन फिरवताना क्षणभराची चूक किती महागात पडू शकते, याचीही गंभीर आठवण करून देणारा ठरत आहे.

येथे पाहा व्हिडीओ