Kangana Ranaut slams viral fake news: राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या बाबतीत अनेक चर्चा व्हायरल होत असतात. अर्थात अफवांवर आधारीत चर्चांना कोणताही आधार नसतो. मात्र यामुळे संबंधित व्यक्तींची बदनामी होत असते. भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्याबद्दलची एक अफवा सध्या व्हायरल होत होती. ज्यावर आता त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी भाजपामध्ये आल्यास त्यांच्याशी लग्न करणार’, असे विधान कंगना रणौत यांच्या नावाने व्हायरल झाले होते. यावर आता कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना रणौत यांच्या नावाने व्हायरल होणारे विधान मिम्सच्या स्वरुपात असले तरी ते मानहानीकारक होते. मात्र सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यानंतर कंगना रणौत यांनी त्यावर टीका केली.
कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत ही बातमी घाणेरडी आणि हलक्या दर्जाची असल्याचे म्हटले आहे. तसेच अशाप्रकारच्या बातम्या विनोद म्हणून व्हायरल करणाऱ्यांना राजकारणातील महिलांच्या सन्मानाची कदर नाही.
कंगना रणौत यांच्या नावाची फेक पोस्ट काय होती?
आम आदमी पक्षाचे माजी नेते राघव चड्ढा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची चर्चा सुरू झाली. एका सोशल पेजवर कंगना रणौत यांच्या नावाने एक मिम तयार करण्यात आले. “जर राहुल गांधी भाजपात आले तर मी त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे”, असे विधान कंगना रणौत यांच्या फोटोसह व्हायरल करण्यात आले.
कंगना रणौत यांनी हे मिम आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्यावर आपली प्रतिक्रिया लिहिली आहे. “ही किती घाणेरडी बातमी आहे. राजकारणातील महिलांचाही सन्मान राखला जात नाहीये. ज्यांनी अशी बातमी व्हायरल केली, त्यांना लाज वाटायला हवी”, अशी संतप्त प्रतिक्रिया कंगना रणौत यांनी दिली.

राहुल गांधींच्या विरोधात टीका
कंगना रणौत या खासदार होण्याच्या आधीपासून काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करत आल्या आहेत. २०२४ साली हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर लोकसभेत सातत्याने त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकास्र सोडले. राहुल गांधी यांच्या भाषणांना त्या मॅजिक शो आणि स्टँड अप कॉमेडी म्हणतात.
