Kanpur news a vegetable seller who went to pick up the scales thrown by the police should lose both his legs | Loksatta

हृदयद्रावक: पोलिसांनी फेकलेला तराजू उचलण्यासाठी गेलेल्या भाजीविक्रेत्याला गमवावे लागले दोन्ही पाय

संतापजनक बाब म्हणजे हा अपघात घडल्यानंतर तिथे उपस्थित असणारे दोन्ही पोलिस जखमी इरफानची दखल न घेताच पळाले

हृदयद्रावक: पोलिसांनी फेकलेला तराजू उचलण्यासाठी गेलेल्या भाजीविक्रेत्याला गमवावे लागले दोन्ही पाय
तराजू उचलण्यासाठी गेलेल्या भाजी विक्रेत्याला रेल्वेची धडक. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कानपूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका भाजी विक्रेत्याने रेल्वे स्टेशनजवळ लावलेले दुकान काढण्यासाठी आलेल्या पोलिसांनी दुकानदाराचा तराजू रेल्वे रुळावर फेकून दिला. तो तराजू उचलण्यासाठी गेलेल्या भाजी विक्रेत्याला रेल्वेने धडक दिल्यामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. या घटनेनंतर नागरिकांकडून पोलिसांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर पोलिसांनी एवढं निर्दयी वागू नये असं नागरिक म्हणत आहेत.

मात्र, पोलिसांवर करण्यात येत असलेले आरोप DCP लक्ष्मण यादव यांनी फेटाळले आहेत. यादव यांनी सांगितलं की, “इरफान हा रेल्वे रुळाशेजारी भाजी विकत होता, यावेळी त्याला पोलिस आल्याचं दिसताच त्याने घाईघाईत तेथून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी त्याचा तराजू रेल्वे रुळावर पडला. पडलेला तराजू उचलताना त्याला रेल्वेने धडक दिली. शिवाय इरफानला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचंही यादव यांनी सांगितलं.

पोलिसांनीच फेकला तराजू –

हेही वाचा- ‘खात्यात पैसे का नाहीत?‘ म्हणत बाईने घातला बॅंकेत राडा; दगडाने फोडल्या ATM च्या काचा अन्…

दरम्यान, इंदिरा नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी शादाब खान आणि हेड कॉन्स्टेबल राकेश यांनीच जीटी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचा पाठलाग केला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. तर एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “पोलिसांनी इरफानचा तराजू आणि भाजीपाला रेल्वे रुळावर फेकला, फेकलेला वजनकाटा उचलण्यासाठी तो गेला असता त्याला रेल्वेने धडक दिली.”

अपघात घडताच पोलिस फरार –

संतापजनक बाब म्हणजे हा अपघात घडल्यानंतर तिथे उपस्थित असणारे दोन्ही पोलिस जखमी इरफानची दखल न घेताच पळून गेले. त्यानंतर नियंत्रण कक्षातील अधिकारी आले आणि जखमी इरफानला एलएलआर रुग्णालयात घेऊन गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

हेही वाचा- सकाळी मुलीला जन्म दिला आणि संध्याकाळी बनली ८० लाखाची मालकीन; मुलीच्या जन्मामुळे असं पालटलं महिलेचं नशीब

इरफानचे वडील चालवतात रिक्षा –

इरफानचे वडील सलीम अहमद हे एक ऑटोरिक्षा चालवतात त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते म्हणाले, “माझ्या मुलाचे दोन्ही पाय जागीच निकामी झाले असून तो केवळ २० वर्षांचा आहे.” दरम्यान, स्थानिकांनी आरोप केला की, पोलिस येथील प्रत्येक भाजी विक्रेत्याकडून दररोज ५० रुपये घेतात आणि तरीही ते त्यांना हाकलून देतात. स्थानिकांचा हा आरोप डीसीपी यादव यांनी फेटाळला असून रेल्वे परिसरातील जागा मोकळी करण्यासाठी आम्हाला अशा कारवाया कराव्या लागतात असं त्यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 18:44 IST
Next Story
भूक लागल्याचे सांगण्यासाठी मांजरीने काय केले पाहा; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू