Karachi Ganesh Math Mandir Viral Video: भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या कराचीमध्ये गणेशोत्सवाच्या तयारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, एका मुस्लिम कलाकाराकडून गणपती बाप्पांच्या मूर्तीला रंग देण्यात येत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
कराचीच्या गणेश मठ मंदिरात बाप्पांची मूर्ती
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कराचीतील गणेश मठ मंदिरमध्ये एक कलाकार गणपती बाप्पांच्या पांढऱ्या मूर्तीला रंग देताना दिसतो. सुरुवातीला स्प्रे पेंटच्या माध्यमातून मूर्तीला रंग देण्यात येतो. त्यानंतर ब्रशच्या मदतीने बाप्पांच्या मूर्तीवर बारकाईने रंगकाम आणि सजावटीचे काम केले जाते. मूर्तीला अधिक आकर्षक रूप देण्यासाठी सोनेरी आणि चंदेरी रंगांचाही वापर करण्यात आला आहे. गणेश मठ मंदिर कराचीतील एका महाराष्ट्रीयन कुटुंबाकडून चालवले जाते, अशी माहिती व्हायरल पोस्टमध्ये देण्यात आली आहे. कराचीमध्ये मराठी समुदाय आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरांशी संबंधित उपक्रम या मंदिराशी जोडले गेलेले आहेत.
‘कोण हिंदू, कोण मुस्लिम?’; VIDEO viral
हा व्हिडीओ शेअर करताना कराचीतील कंटेंट क्रिएटर अमर प्रकाश यांनी लिहिलं आहे की, “A Muslim artist painting Ganpati Bappa inside Ganesh Math Mandir…”. व्हिडीओवरही “Kaun Hindu? Kon Muslim? The power of Bappa and beauty of Karachi” असा कॅप्शन दिसतो. व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या कलाकाराच्या कौशल्याचं कौतुक केलं. काही नेटकऱ्यांनी हा क्षण धार्मिक सलोखा, कला आणि माणुसकीचं उदाहरण असल्याचं म्हटलं. “Humanity is the best religion” आणि “This is beautiful” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर पाहायला मिळाल्या.
धर्मापेक्षा कला आणि माणुसकी मोठी?
गणपतीची मूर्ती रंगवताना कलाकार ज्या बारकाईने काम करताना दिसतो, त्यामुळे हा व्हिडीओ केवळ गणेशोत्सवाच्या तयारीपुरता मर्यादित राहत नाही. कलेला धर्माची सीमा नसते, हा संदेश या प्रसंगातून अधोरेखित होत असल्याचं अनेकांना वाटत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा सुरू असताना, काही जणांनी कलाकार आपलं व्यावसायिक काम करत असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, कराचीतील मंदिरात गणपती बाप्पांच्या मूर्तीला रंग देतानाचा हा अनोखा क्षण नक्कीच लक्षवेधी ठरला आहे.
