एका लहानश्या मुलीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना आपली पॉकेटमनीच देऊ केला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच या चिमुकलीच्या आईचा दोन वर्षापूर्वी एक अपघात झाला होता. यात तिच्या आईला एक पाय गमवावा लागला. आपल्यासारखी वेळ आणखी इतर दुसऱ्या कुणावर येऊ म्हणून या चिमुकलीने एक व्हिडीओ बनवून थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलाय. या व्हिडीओमधून तिने रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचं आवाहन केलंय. तसंच यासाठी तिने मुख्यमंत्र्यांना आपली पॉकेटमनी सुद्धा देऊ केलाय. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

TOI च्या रिपोर्टनुसार, या व्हायरल व्हिडीओमधली मुलगी ही कर्नाटकची असून तिने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना ‘टाटा’ असं संबोधलंय. आजोबांना कन्नडमध्ये ‘टाटा’ म्हणतात. ही मुलगी इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी असून धवनी एन. हुग्गनहल्ली असं तिचं नाव आहे. ती एका सरकारी शाळेत शिक्षण घेतेय. तिचे वडील तुमकुरू जिल्ह्यातील तिप्तूर इथे बांधकाम मजूरीचं काम करतात. एका ६५ अपंग व्यक्तीचा पश्मिम बंगळूर इथल्या रस्त्यावर अपघात होऊन यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना आवाहन करणारा हा व्हिडीओ पाठवलाय. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्या अपंग व्यक्तीची तीनचाकी गाडी पलटली आणि यात त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे प्राण जात असल्याचं पाहून या चिमुकलीने हे पाऊल उचललंय.

या व्हिडीओमध्ये ही चिमुकली म्हणतेय, “टाटा, आमच्या बंगळुरूमध्ये रस्त्यांची स्थिती चांगली नाही. कारण रस्त्यांवर खूप खड्डे झाले आहेत. कृपया हे खड्डे दुरुस्त करा टाटा. ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यांची कुटुंबे अनाथ होत आहेत. त्यांच्या कुटुंबाची काळजी कोण घेणार? कुटुंबातील काही सदस्य कामावर जातात आणि बाकीचे घरी त्यांची वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे माझे वडील सुखरूप घरी परत येण्याची मी वाट पाहत असते. कृपया रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून त्यांचे प्राण वाचवा.” ही चिमुकली केवळ आवाहन करूनच थांबली नाही तर तिने आपली पॉकेटमनी सुद्धा रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामासाठी दिली आहे.

Indianexpress.com शी बोलताना धवनी म्हणाली, “मी आणि माझी आई खड्ड्यांमुळे बाईकवरून अनेकदा पडलो आहे. मी माझ्या शाळेच्या लायब्ररीत वर्तमानपत्रात वाचत असताना बंगळुरूमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या बातम्या वाचत असते. म्हणून मी माझ्या आईच्या मदतीने हा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांना पाठवून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीव वाचवण्याची विनंती केली आहे.

धवनीची आई रेखा नवीन कुमार म्हणाली, “गेल्या वर्षी खड्ड्यांमुळे माझा अपघात झाला आणि यात माझा पाय फ्रॅक्चर झाला, तेव्हापासून खड्डय़ात बळी पडलेल्या लोकांच्या वेदना धवनी आणि माझ्या कुटुंबाला खूप जवळून माहीत आहेत. तिला ते आठवतं. पीडितांचे दु:ख तिला माहीत आहे आणि खड्ड्यांसंबंधीच्या घटनांबद्दल ती वर्तमानपत्रात वाचत असल्याने तिने मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली आहे.”

अलीकडेच, शहरातील खड्ड्यांसाठी जबाबदार असलेल्या नागरी संस्थेच्या निषेधार्थ तिथल्या काही स्वयंसेवक आणि निवासी कल्याणकारी संघटना (RWA) सदस्यांनी खड्ड्यांची पूजा करत आंदोलन केलं होतं. अनेक आंदोलन होऊन देखील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.