IPS Abhishek Verma overcharging parking ticket 60 rupees video viral: पार्किंगसाठी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा काही ठिकाणी चालकांकडून अधिक पैसे आकारले जातात. त्यास चालकांनी विरोध केल्यास एक तर गाडी पार्क करून देण्यास विरोध केला जातो किंवा कायदेशीर नियमांचे दाखले दिले जातात. अशाच प्रकारचा अनुभव आता एका आयपीएस अधिकाऱ्याला आला आहे. उत्तर प्रदेशातील हापूरमधील आयपीएस अधिकारी अभिषेक वर्मा हे त्यांच्या कारने चालकाच्या शेजारी बसून ब्रजघाटकडे जात होते. यावेळी तिथे त्यांनी गाडी पार्किंगसाठी एक पावती फाडली; पण पार्किंग अटेंडन्टने पावतीवर लिहिलेल्या रकमेपेक्षा जादाचे पैसै आकारले. त्यावर वर्मा यांनी उरलेले पैसे परत करण्याची मागणी केली; पण पार्किंग अटेंडन्टने ‘कायदे में चलो’ म्हणत त्यांनाच नियमांचा दाखला देण्यास सुरुवात केली, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून आता सर्वसामान्य लोक हापूरचे एसपी अभिषेक वर्मा यांचे कौतुक करीत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील हापूरमधील आयपीएस अधिकारी अभिषेक वर्मा शनिवारी साध्या पेहरावात चालकाबरोबर कार घेऊन गडमुक्तेश्वर येथील ब्रजघाटावर पोहोचले. यावेळी ते गाडी पार्किंग करण्याच्या ठिकाणी पोहोचले. तिथे त्यांना पार्किंगची पावती देण्यात आली. ही पावती त्यांनी नीट पाहिली असता, त्यावर ५३ रुपये लिहिले होते; पण पार्किंग अटेंडन्टने त्यांच्याकडून ६० रुपये घेतले. त्यावर वर्मा यांनी आक्षेप घेतला आणि उरलेले पैसे परत करण्याची मागणी केली. पण, पार्किंग अटेंडन्टने ‘कायदे में चलो’, असे म्हणत त्यांना उरलेले पैसे परत देण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी प्रायव्हेट कॅमेऱ्या मदतीने सर्व घटना रेकॉर्ड केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, ही घटना इथेच थांबत नाही.

आयपीएस अधिकाऱ्याकडून गाडी पार्किंगच्या नावाखाली ५३ रुपयांऐवजी ६० रुपये उकळणाऱ्या पार्किंग अटेंडन्टलाच आता थेट पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. कोठडीत पोहोचताच आयपीएस अधिकाऱ्याने त्या पार्किंग अटेंडन्टचा एक फोटो आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट केला आहे; ज्यावर त्यांनी लिहिले की, कायदे में रहोगे, तो फायदे में रहोगे.

अशा प्रकारे एका आयपीएस अधिकाऱ्यामुळे पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली लूट उघड झाली. त्यामुळे आयपीएस अधिकारी अभिषेक वर्मा यांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या या पोस्टवर आता लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. अनेकांनी असे आयपीएस अधिकारी असावेत, अशा स्वरूपाच्या कमेंट्स केल्या आहेत. तर, अनेकांनी आरोपीचा ‘सुंदर चेहरा’ न लपवता उघड केला पाहिजे होता, असेही म्हटले आहे.