Kedarnath Yatra 2026 Guide : मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर २२ एप्रिल २०२६ रोजी केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. आता भाविकांना बाबा केदार यांचे दर्शन घेता येणार आहे. त्यात बद्रीनाथ धामचे दरवाजे २३ एप्रिल रोजी उघडण्यात आले. गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे १९ एप्रिल २०२६ रोजी खुले झाले. त्यासह चार धाम यात्रा २०२६ ला देखील सुरुवात झाली आहे. त्यात जर तुम्हीही केदारनाथ धामच्या तीर्थयात्रेला जात असाल, तर तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहेत, हे जाणून घेऊ…

केदारनाथ यात्रा कुठून सुरू होते?

चार धाम यात्रा पारंपरिकरीत्या यमुनोत्री येथून सुरू होते. केदारनाथ यात्रा अंदाजे सहा महिने चालते. केदारनाथ यात्रा ही चार धामांपैकी सर्वांत कठीण मानली जाते. केदारनाथ यात्रा सहसा हृषिकेश/हरिद्वार येथून सुरू होते. केदारनाथ यात्रेला पोहोचण्यासाठी गौरीकुंडपासून १६-१८ किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. जे चालू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे. केदारनाथमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी असू शकते. त्यामुळे लोकरीचे कपडे, रेनकोट आणि मजबूत ट्रेकिंग शूज बरोबर घेऊन जाणे गरजेचे ठरते.

केदारनाथ धाम यात्रेसाठी नोंदणी आवश्यक

केदारनाथ धाम उत्तराखंडच्या पवित्र खोऱ्यांमध्ये वसलेले आहे. केदारनाथ धाम यात्रेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीशिवाय कोणत्याही भाविकाला प्रवास करण्याची परवानगी दिली जात नाही, नोंदणीनंतर भाविकांना दर्शनासाठी स्लॉट टोकन दिले जाते.

नोंदणी कुठे करायची?

१) केदारनाथ यात्रेसाठी नोंदणी करण्याकरिता, तुम्हाला उत्तराखंड सरकारच्या registrationandtouristcare.uk.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचा तपशील भरावा लागेल.
२) नोंदणीनंतर दर्शनासाठी एक स्लॉट टोकन दिले जाईल, जे वाटेत तपासले जाईल.
३) गूगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून ‘टुरिस्ट केअर उत्तराखंड’ मोबाईल ॲप डाऊनलोड करूनही नोंदणी करता येते.
४) व्हॉट्सॲपद्वारेही नोंदणी करता येते.
५) भाविक +91 8394833833 या मोबाईल नंबरवर ‘Yatra’ असा मेसेज पाठवून आणि दिलेल्या सूचनांचे पालन करून, आपली नोंदणी पूर्ण करू शकतात.

मोबाईल, कॅमेऱ्यावर बंदी

केदारनाथ, बद्रीनाथ व गंगोत्री मंदिर परिसरात मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांना सक्त मनाई आहे. त्यामुळे कृपया या वस्तू सोबत बाळगणे टाळा. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा मोबाईल फोन जमा करावा लागेल. या उद्देशासाठी एक क्लॉक रूम उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वैद्यकीय तपासणी

केदारनाथ यात्रेसाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. विशेषतः ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी आरोग्य तपासणी अनिवार्य आहे. मधुमेह आणि दमा यांसारखे आजार असलेल्या व्यक्तींसाठी ही तपासणी विशेष महत्त्वाची आहे.

गौरीकुंड ते केदारनाथसाठी घोडा, खेचर, पालखी आणि हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध आहे. जे भाविक पायी प्रवास करू शकत नाहीत, ते या सेवांचा लाभ घेऊ शकतात. हेलिकॉप्टर सेवेचे बुकिंग फक्त आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरूनच करता येते.

प्रवासी heliyatra.irctc.co.in या पोर्टलवर जाऊन तिकीट बुक करू शकतात. केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टर सेवा गुप्त काशी, फाटा व सिरसी या तीन प्रमुख ठिकाणांहून चालवली जाते. गुप्त काशी ते केदारनाथ हेलिकॉप्टरचे भाडे १२,७६२ रुपये आहे. फाटा ते केदारनाथचे भाडे १०,१६४ रुपये आणि सिरसी ते केदारनाथचे भाडे ६,३९० रुपये आहे.