Keeway Hypevolt-R Electric Scooter Launched in India: ‘कीवे इंडिया’ने भारतीय बाजारपेठेत आपली पहिली प्रीमियम परफॉर्मन्स इलेक्ट्रिक स्कूटर सादर करीत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात दमदार एन्ट्री केली आहे. कंपनीने या नव्या स्कूटरला Keeway Hypevolt-R हे नाव दिले असून, आकर्षक डिझाईन, दमदार कामगिरी आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ती लॉंच होताच चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे या स्कूटरमध्ये अशा काही सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्या आतापर्यंत प्रामुख्याने कारमध्येच पाहायला मिळत होत्या. त्यामुळे ही स्कूटर नेमकी काय खास घेऊन आली आहे, याची उत्सुकता वाहनप्रेमींमध्ये वाढली आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन बाजारात उपलब्ध असलेल्या पारंपरिक स्पोर्टी स्कूटर्सपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. समोरील भागात उभ्या रचनेतील एलईडी हेडलॅम्प दिले असून, त्याचा आधुनिक आणि आक्रमक लूक लगेच लक्ष वेधून घेतो. शहरातील वापरासोबतच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ही स्कूटर उपयुक्त ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे.
कीवे हाइपवोल्ट-आरमध्ये मिड-माऊंटेड पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर देण्यात आली आहे. ही मोटर तब्बल १२ किलोवॉट इतकी कमाल शक्ती निर्माण करते. त्यामुळे ही स्कूटर अवघ्या २.३ सेकंदांत ताशी ४० किलोमीटरचा वेग गाठतो. तिचा कमाल वेग ताशी ११५ किलोमीटर इतका असल्याने ही स्कूटर वेग आणि कार्यक्षमतेचा उत्तम संगम ठरू शकते.
रायडरच्या गरजेनुसार या स्कूटरमध्ये इको, नॉर्मल व स्पोर्ट्स असे तीन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. शहरातील दैनंदिन वापर असो किंवा वेगवान प्रवास, परिस्थितीनुसार मोड बदलून, अधिक चांगली रेंज आणि कामगिरी मिळवता येते.
या स्कूटरचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॅटरी. यात प्रत्येकी ५kWh क्षमतेच्या दोन काढता येणाऱ्या बॅटऱ्या देण्यात आल्या आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, पूर्ण चार्जवर ही स्कूटर तब्बल १८० किलोमीटरपर्यंत धावू शकतो. बॅटरी स्कूटरमध्ये बसवून किंवा बाहेर काढूनही चार्ज करता येते. विशेष चार्जरच्या मदतीने ती ० ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागतो.
आरामदायी प्रवासासाठी समोरील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस पाच टप्प्यांत समायोजित करता येणारे ट्विन शॉक अॅब्सॉर्बर देण्यात आले आहेत. त्याशिवाय १४ इंचांचे अलॉय व्हील्स आणि १३० मिमी ग्राउंड क्लीअरन्समुळे खराब रस्त्यांवरही प्रवास अधिक सोईचा होतो.
फीचर्सच्या बाबतीतही ही स्कूटर खूपच समृद्ध आहे. त्यात ५ इंचांचा टीएफटी डिजिटल डिस्प्ले, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, एलईडी दिवे, रिव्हर्स मोड, टाईप-सी आणि टाईप-ए चार्जिंग पोर्ट तसेच २७ लिटर क्षमतेची अंडरसीट स्टोरेज जागा देण्यात आली आहे.

सुरक्षेवरही कंपनीने विशेष भर दिला आहे. या स्कूटरमध्ये ड्युअल चॅनेल एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, क्रूझ कंट्रोल, एडीएएस व नेव्हिगेशन यांसारखी आधुनिक स्मार्ट फीचर्स देण्यात आली आहेत. त्यामुळे ही स्कूटर केवळ आकर्षक दिसत नाही, तर सुरक्षित आणि तंत्रज्ञानाने सज्ज, असा पर्याय म्हणूनही ती समोर आली आहे.
बुकिंगची सुरुवात अवघ्या ५,००० रुपयांपासून करण्यात आली आहे. मात्र, या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १.९९ लाख रुपये (नवी दिल्ली) निश्चित करण्यात आली असून, ती क्रिस्टल व्हाईट आणि प्लॅटिनम ग्रे अशा दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.
