मानवी आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. आयुष्याच्या कोणत्या वळणावर तुमच्या हातात सुख किंवा दु:ख येईल हे कोणालाच माहीत नसतं. आता केरळच्या या ७२ वर्षीय पेंटरचं घ्या. आयुष्याची ७२ वर्षे संघर्षात घालवली. पण काही तासांपूर्वी नशिबाने असे वळण घेतले की आज या व्यक्तीजवळ १२ कोटी रुपये आहेत. सदानंद यांना १२ कोटींची बंपर लॉटरी लागली आहे. केरळमधील कोट्टायम येथे राहणाऱ्या सदानंदन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. केरळ सरकारच्या ख्रिसमस-न्यू इयर बंपर लॉटरीत त्यांनी ही रक्कम जिंकली आहे. सदानंदन गेल्या ५० वर्षांपासून पेंटिंगचे काम करतात, परंतु आता सदानंदनच्या आयुष्यात सर्वकाही बदलले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळमधील कुदयमपाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या सदानंदन उर्फ ​​सदन यांनी सांगितले की, ड्रॉ संपण्याच्या पाच तास आधी त्यांनी एका दुकानदाराकडून XG 218582 क्रमांकाचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. तो म्हणाला, ‘मी रविवारी सकाळी जवळच्या बाजारातून मांस विकत घेण्यासाठी जात होतो. त्याचवेळी मी हे तिकीट सेल्वन (तिकीट विक्रेता) कडून घेतले होते.’ हे तिकीट कोट्टायम शहरातील लॉटरी एजंट बिजी वर्गीस यांनी कुडेमपाडीजवळील पांडवम येथील लॉटरी विक्रेता कुन्नेपरंबिल सेल्वन यांना विकले होते. या पैशांचे तुम्ही काय कराल, असे सदानंदन यांना विचारले असता, सदानंदन म्हणाले की, या पैशांचा उपयोग मी मुलांचा सांभाळ करण्यासाठी करणार आहे.

या लॉटरीचे तिकीट फक्त ३०० रुपये होते. लॉटरीची दुसरी आणि तिसरी बक्षिसेही वितरीत करण्यात आली आहेत. द्वितीय पारितोषिक जिंकलेल्या ६ जणांना ३ कोटी रुपये तर तृतीय पारितोषिक जिंकणाऱ्या ६ भाग्यवान विजेत्यांना ६० लाख रुपये देण्यात आले. स्थानिक अहवालानुसार, लॉटरी विभागाने यापूर्वी २४ लाख तिकिटे छापली होती, परंतु या तिकिटांची विक्री झाल्यानंतर विभागाने ९ लाख आणि ८.३४ लाख तिकिटे दोनदा छापली. याआधी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केरळच्या एका ड्रायव्हरने लॉटरीत १२ कोटी रुपये जिंकले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala a middle aged painting worker got lottery of 12 crore rmt
First published on: 18-01-2022 at 18:02 IST