बागेत गप्पा मारणा-या एका प्रेमी जोडप्यावर मॉरल पोलिसिंग करत तरुंगात नेण्याचा प्रयत्न दोन पोलिसांनी केला. पोलिसांच्या छळाचे या जोडप्याने फेसबुकवर लाईव्ह स्टिमिंग केले त्यामुळे हा संपूर्ण प्रकार आता उघडकीस आला आहे.

मॉरल पोलिसिंगच्या नावावर जोडप्यांचा छळ करणे, त्यांना मानसिक त्रास देणे हा प्रकार केरळामध्ये काही नवा नाही. प्रेमी युगुल अश्लिल वागतात, समाजाची नैतिक मुल्य पायदळी तुडवता असे आरोप करून या जोडप्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेले जाते, त्यांना तुरुंगात डांबले जाते किंवा त्यांच्याकडून दंड वसूल केले जातात. स्वत:ला नैतिकतेचे संरक्षक म्हणून घेणा-या या पोलिसांमुळे इथले प्रेमी युगुल आधीच त्रस्त आहे. त्यातून व्हॅलेंटाइन डेच्या काही दिवसांनंतर बागेत बसलेल्या एका जोडप्याला याच कारणावरून पोलिसांनी त्रास द्यायला सुरूवात केली. बागेत बसून ते अश्लिल प्रकार करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगण्यात आले. तिरुवनंतपुरमच्या एका बागेत विष्णू आणि आरती या जोडप्यासोबत हा प्रकार घडला. वास्तविक हे जोडपे फक्त बागेत बसले होते.

पण नैतिकतेच्या संरक्षकांनी मात्र त्यांना त्रास द्यायला सुरूवात केली. आपला गुन्हा काय आहे? असा प्रश्न या जोडप्यांनी केला, पण पोलीस मात्र ऐकायलाच तयार नव्हते म्हणून विष्णूने आपल्या फेसबुकवर हा संपूर्ण प्रकार लाईव्ह केला. आपल्या प्रेयसीच्या खांद्यावर हात टाकून बसणे म्हणजे अश्लिलपणा होत नाही हे वारंवार तो पोलिसांना सांगत होता. या बागेत सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, आपण हग किंवा किस देखील केलं नाही याचे फुटेजही पोलीस सीसीटव्हीमध्ये पाहू शकता असेही हे जोडपे वारंवार पोलिसांना सांगत होते पण पोलिसांनी मात्र ऐकलं नाही.
महिला पोलीस अधिका-याने आपल्या सहका-यांना बोलवून या दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि त्यांच्याकडून दोनशे रुपयांचा दंडही वसूल केला. या घटनेचा व्हिडिओ आता फेसबुकवर व्हायरल होत आहे.