केरळमधील कोच्ची शहरामध्ये असलेल्या ‘श्री बालाजी कॉफी हाऊस’चे मालक के. आर. विजयन यांचं निधन झालं आहे. विजयन हे ७१ वर्षांचे होते. चहा विक्री करुन पैसे जमवून आपल्या पत्नीसोबत अनेक देशांमध्ये भटकंती करणारे विजयन आजोबा काही वर्षांपूर्वी त्यांच्या या पर्यटन प्रेमामुळे चर्चेत होते. चहाविक्रेत्याने सहपत्नीक केलेली जगभ्रमंती ही अनेक नोकरदार आणि भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली.

केरळमधील ट्रॅव्हलिंग कपल म्हणून विजयन आणि त्यांची पत्नी मोहना यांना ओळखलं जातं. छोटं चहाचं दुकान चालवून त्यामधून जमा खर्च आणि दैनंदिन गरजा भावून उरलेले पैसे साठवत या जोडप्याने जगातील अनेक देशांमध्ये पर्यटनानिमित्त भटकंती केलीय. गांधीनगरमधील एक चहाच्या टपरीच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईच्या जोरावर त्यांनी आपली भटकंतीची हौस पूर्ण केली.

विजयन आणि मोहना यांचं लग्न ४० वर्षांपूर्वी झालेलं. त्यांनी एकत्र २६ देशांची भटकंती केलीय. नुकतेच ते रशियालाही जाऊन आले होते. ऑक्टोबर महिन्यातील रशियाचा दौरा हा या जोडप्याचा एकत्र असा शेवटचा दौरा ठरला. हा रशियाचा दौरा त्यांचा करोना लॉकडाउननंतरचा पहिलाच दौरा होता. २००७ पासून हे दोघे भटकंती करत होते. वर्षभर कष्ट करुन पैसे साठवायचे आणि नंतर त्यामधून एखाद्या देशात हे दोघे फिरून यायचे. आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यासाठी ते इस्रायलला गेले होते. त्यानंतर ते ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, इजिप्त, युएई, अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये जाऊन आलेत. ते त्यांच्या या छंदामुळे सेलिब्रिटी झाले होते. त्यांच्या दुकानात त्यांच्या भटकंती विषयाच्या लेखांच्या फ्रेम्सबरोबरच जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या वेळा दाखवणारी घड्याळं खास आकर्षण होतं.

या दोघांची कल्पना महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना फार बावली होती. २०१९ मध्ये महिंद्रा यांनी या दोघांच्या दौऱ्याचा सर्व खर्च उचलण्याचा मानस बोलून दाखवला होता. २०१९ साली डिसेंबर महिन्यामध्ये विजयन आणि मोहना करोनाचा प्रादुर्भाव सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला जाऊन आलेले.

मागील महिन्यामध्ये रशिया दौऱ्याआधी विजयन यांनी आम्हाला या देशाचा दौरा करण्याची फार इच्छा होती. ती इच्छा आता पूर्ण होतेय, असं म्हणत समाधान व्यक्त केलेलं. या दौऱ्यामध्ये या दोघांबरोबर त्यांची नातवंडंही होती. आर्थिक नियोजनाबद्दल बोलताना आम्ही दिवसाला ३०० रुपये बाजूला काढून ठेवयचो. वर्षभरातून एक, दोनदा भटकण्यासाठी हे साठलेले पैसे आणि काही कर्ज काढून घेतलेले पैसे वापरुन आम्ही भटकंती केली असं विजयन यांनी सांगितलेलं. हे कर्ज लवकरात लवकर फेडून पुढील दौऱ्यासाठी हे जोडपं पैसे जमा करण्याला प्राधान्य द्यायचंय. लहानपणी विजयन यांचे वडील त्यांना भारतामधील वेगवगेळ्या भागांमधील मंदिरं दाखवण्यासाठी घेऊन जायचे. त्यामधून त्यांना भटकंतीची आवड निर्माण झाल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं.

शुक्रवारी सायंकाळी वृद्धपकाळाने विजयन यांचं निधन झालं.