सोमवारी ईद-ए-मिलाद म्हणजेच पैगंबर मोहम्मद यांची जयंती होती. त्यांच्या जयंतीला मुस्लीम बांधवांनी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांना हिंदुनी मिठाई वाटून हा आनंदोत्सव साजरा केला. केरळमध्ये झालेल्या या घटनेची दखल टु सर्कल डॉट नेट या वेबसाइटने घेत हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

केरळमधील मालाबार जिल्ह्यात एक दोन ठिकाणी नव्हे तर ठिकठिकाणी हे चित्र पाहायला मिळाल्याचे वेबसाइटने म्हटले आहे. मालाबारमधील चंद्रगिरी, उडुमा, तिरुर, कोंडोट्टी आणि नेदियिरुप्पी या हिंदू-मुस्लीमांनी एकत्र येऊन ही ईद साजरी केली. मिरवणुकीला निघालेल्या मुस्लीम बांधवांना त्यांनी सरबत, मिठाई आणि पायसम म्हणजेच खीर वाटली.

उल्लेखनीय बाब म्हणजे अयप्पा स्वामींचे काही भक्त या कार्यात सहभागी होते. अयप्पा स्वामींचे भक्त आपल्या काळ्या कपड्यात, अनवाणी राहून ही सेवा करीत होते. अयप्पा स्वामीच्या व्रत स्वीकारल्यावर दिवसभर उपास करावा लागतो. आपला उपास असून ईद-ए-मिलादच्या उत्सवात सहभागी झाल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

लोकप्रिय ट्विटर अकाउंट अनऑफिशियल सुब्रमण्यम स्वामी या अकाउंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. १५-२० वर्षांपूर्वी हे दृश्य फार साधारण होते. तेव्हा हिंदू-मुस्लीम एकत्र येऊनच सर्व सण साजरे करीत असत परंतु आता परिस्थिती बदलली आहे तेव्हा अशा प्रकारच्या लोकांना प्रोत्साहन द्या असे या ट्विटर अकाउंटवर म्हटले गेले आहे. तसेच अशा प्रकारची चित्रे पाहून आपल्यालाही उत्साह येईल असे म्हटले आहे.

काही दिवसापुर्वीच केरळमध्ये एका हिंदू आणि मुस्लीम जोडप्याने एकमेकांच्या पत्नीसाठी किडनी दान केल्याची घटना घडली होती. या घटनेनी समाजात एक नवा आदर्श निर्माण केला होता. हिंदू मुस्लीम एकतेच्या या अनोख्या उदाहरणामुळे केरळचे नाव चर्चेत आहे. अलीकडील काही काळात सातत्याने धार्मिक तणावाचे वृत्त कानावर पडत आहे त्या परिस्थितीमध्ये अशी घटना नक्कीच सुखावह आहे.