जगातील सर्वाधिक विचित्र नियम आणि कायम स्वत:च्या नावाभोवती एक प्रकारचं रहस्य असणारा देश म्हणजेच उत्तर कोरिया. या देशामधील अनेक गोष्टी आणि बातम्या खूप क्वचितच जगासमोर येतात. मात्र समोर आलेल्या बातम्याही अनेकदा धक्कादायक आणि गोंधळवून टाकणाऱ्या असतात. या देशामधील कोणती माहिती जागतिक स्तरावर पाठवावी आणि कोणती नाही याचे सर्व हक्क सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे आहेत. त्यातच या देशातील कायदाही अगदी विचित्र आहे. नुकताच या देशाने पायरेटेड साहित्य आणि प्रसारमाध्यमांसंदर्भातील एका कायद्यामध्ये बदल केला. विशेष म्हणजे या कायद्यामध्ये बदल केल्यानंतर एका व्यक्तीला दोषी ठरवून त्याला मृत्यूदंडाची शिक्षाही देण्यात आलीय.

बदल करण्यात आलेल्या कायद्यानुसार दोषी आढळलेल्या व्यक्तीला सर्वांसमोर गोळ्या घालून ठार करण्यात येतं. नवीन कायदा अंमलात आणल्यानंतर एका व्यक्तीला पायरेटेड सीडी विकताना रंगेहाथ पकडण्यात आलं. पायरसीच्या गुन्ह्याखाली या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या व्यक्तीकडे सीडी रोम मेमरी स्टिक्स आढळून आल्या होत्या. यामध्ये शत्रू राष्ट्र समजल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियामधील चित्रपट, गाणी आणि म्युझिक व्हिडीओ होते. या व्यक्तवरील गुन्हे सिद्ध झाल्यानंतर त्याला मृतदंडाची शिक्षा देण्यात आली. किम जोंग उन हे उत्तर कोरियाचे हुकुमशाह असून त्यांच्याच सरकारने तयार केलेल्या नव्या नियमांनुसार शिक्षा देण्यात आली.

मरण पावलेल्या या व्यक्तीचं नाव ली असल्याची माहिती समोर आलीय. नवीन कायद्यानुसार या व्यक्तीविरोधात देशद्रोह आणि सामाजिक घटकांविरोधात वागणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला. लीकडे दक्षिण कोरियामधील चित्रपट, गाणी आणि टीव्ही शोच्या व्हिडीओंचा समावेश असणारी सीडी होती. ली याला गोळ्या घालण्याआधी ५०० सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मृत्यू पाहण्यासाठी बोलवण्यात आलं. यामध्ये लीच्या नातेवाईकांचाही समावेश होता असं डेलीस्टार या इंग्लंडमधील वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

१२ जणांच्या फायरिंग स्वाडने लीच्या शरीरावर गोळ्या झाडल्या. हे सर्व दृष्य समोर पाहणाऱ्या लीच्या नातेवाईकांना रडण्याचीही परवानगी नव्हती. लीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह ट्रकमध्ये टाकून राजकीय कैदी असणाऱ्या कॅम्पमध्ये नेण्यात आला. लीचे नातेवाईक रडताना दिसले असते तर त्यांच्याविरोधातही देशद्रोही व्यक्तीबद्दल सहानुभूती असल्याचा आरोप ठेवण्यात आला असता.

उत्तर कोरियामध्ये डिसेंबर २०२० पासून कायद्यांमध्ये बदल करण्यात आला असून कायदे कठोर करण्यात आले आहेत. येथे दक्षिण कोरियामधील चित्रपट, टीव्ही शो पाहणे कायद्याने गुन्हा आहे. असं करताना कोणी आढळून आल्यास त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. एखादी व्यक्ती असं कृत्य करत असल्याची माहिती मिळाल्यानंतरही ती यंत्रणांना न देणाऱ्या व्यक्तीला सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा केली जाऊ शकते. नव्या नियमांमुळे देशातील जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे.